भोपाळ : मोबाईल चार्जिंगला लावून तुम्ही बोलत असाल तर सावध व्हा. एक धक्कादायक घटना इंदूरमध्ये घडली असून यात एका तरुणाचा करंट लागून मृत्यू झाला. मोबाईल चार्जिंगला लावून हा तरुण पत्नीशी गप्पा मारत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदोरच्या विक्रम हाइट्समध्ये परिसरात ही घटना घडली आहे. सुजित हृदयनारायण विश्वकर्मा (25) असं मृत तरुणाचं नाव आहे. विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजीत हा मुंबईतील नालासोपारा इथला रहिवासी असून तो फर्निचर बनवण्याचे काम करतो. आठवडाभरापूर्वी एका शोरुममध्ये फर्निचरचं काम करण्यासाठी तो इंदोरमध्ये आला होता. 


शोरुमच्या मागचा भागातच सुजीत आपला भाऊ आणि  सहकाऱ्यांबरोबर रहात होता. घटनेच्या रात्री सुजतीने आपल्या भावाकडून चार्जर घेतला आणि दुसऱ्या खोलीत गेला. तिथे त्याने इलेक्ट्रिक बोर्डाला मोबाईल चार्जिंगला लावला आणि आपल्या पत्नीला फोन केला त्यानंतर तो तिच्याशी गप्पा मारत होता. काही वेळातच सुजीतच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याचा भाऊ आणि सहकाऱ्यांनी तिथे धाव घेतली असता सुजीत बेशुद्धावस्थेत पडला होता.  


चार्जिंगला लावून मोबाईलवरुन बोलत असताना सुजीतला करंट लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुजीतचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्याचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशचं आहे.


संध्याकाळी फर्निचरचं काम पूर्ण झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला जायचा सुजितचा प्लॅन होता, पण ती रात्र सुजीतच्या आयुष्यात काळरात्र ठरली.