नवी दिल्ली : भारतात घराघरामध्ये 'खिचडी' हा पदार्थ हमखास बनवला जातो. जेवण बनवण्याचा कंटाळा आला की झटपट तयार होणारा एक पदार्थ म्हणजे 'खिचडी'. त्यामुळे चविष्ट आणि बहुतांश लोकांना आवडणारी खिचडी जगभरात पोहचावी म्हणून प्रयत्न केले जात आहे.  नवी दिल्ली मध्ये आज ( 4 नोव्हेंबर) रोजी 'वर्ल्ड फूड इंडिया इव्हेंट मध्ये सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर सुमारे ८०० किलो खिचडी बनवणार आहे. या विश्वविक्रमाने 'खिचडी' जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल. 
 
 काही दिवसांपासून 'खिचडी' हा पदार्थ भारताचा राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषित केला गेला अअहे. अशी माहिती सोशल मीडियावर झपाट्यावर फिरत आहे. मात्र युनियन फूड प्रोसेसिंग मिनिस्टर हर्सिम्रत कौर बादल यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. 
 
 कशी बनवली जाते खिचडी ? 
 भारताच्या विविध भागामध्ये खिचडी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, डाळ,मसाले आणि आवडीनुसार इतर काही धान्य मिसळली जातात. भारतातील विविधेतील एकता या गोष्टीचे प्रतिक म्हणजे खिचडी आहे.
 
 नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वर्ल्ड फूड इंडिया २०१७ या महोत्सवाची सुरूवात शुक्रवारी विज्ञान भवनात झाली. तीन दिवस सुरू राहणार्‍या या कार्यक्रमात शेफ संजीव कपूर खिचडी बनवणार आहेत. याकरिता १००० लीटर क्षमतेची कढई वापरली जाणार आहे. ही कढई ७ फीट परिघाची असेल. 
 
 ३-५ नोव्हेंबर दरम्यान सुरू असणार्‍या या मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या या इंव्हेटमध्ये ग्लोबल इंव्हेस्टर्स आणि जगभरातील खाद्य कंपनी येणार आहेत.