धक्कादायक! 7 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, आजोबा, काका आणि मोठा भाऊच बनले नराधम
आजोबा आणि काकाला अटक करण्यात आलं असून मुलीच्या भावाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे
चेन्नई : चेन्नईमध्ये (Chennai) एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर (Girl Child) लैंगिक अत्याचार (Sexual Assault) झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे मुलीचे आजोबा, काका आणि मोठ्या भावाकडूनच हे घृणास्पद कृत्य घडलं आहे. याप्रकरणी आजोबा आणि काकाला अटक करण्यात आलं असून मुलीच्या भावाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.
आजोबांकडून लैंगिक अत्याचार
चेन्नईच्या मडिप्पकम भागातली ही घटना आहे. एका 62 वर्षीय व्यक्तीने आपल्या मोठ्या मुलाच्या 16 वर्षीय मुलगा आणि 7 वर्षांच्या मुलीला आपल्याकडे राहण्यासाठी बोलावलं होतं. 2 ऑगस्टच्या रात्री झोपेत असलेल्या 7 वर्षांच्या मुलीवर आजोबाने लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराने घाबरलेली मुलगी काकांकडे गेली, तर काकानेही शांत करण्याच्या बहाण्याने मुलीशी गैरवर्तणूक केली. मुलीने मदतीसाठी 16 वर्षांच्या भावाकडे धाव घेतली तर त्यानेही मदत करण्याऐवजी आपल्याच अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केला.
8 ऑगस्टला मुलीची आई तिला भेटण्यासाठी गेली असता मुलगी आजारी पडली होती. आईने तपासणीसाठी मुलीला डॉक्टरकडे नेलं. यावेळी मुलीने घडलेली घटना आपल्या आईला सांगितली. वैद्यकिय तपासणीतही मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. मुलीच्या आईने तात्काळ पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी मुलीच्या आजोबा आणि काकाला पोक्सो अंतर्गत अटक करत तुरुंगात धाडलं. तर 16 वर्षांच्या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.