नवी दिल्ली: छत्तीसगढमध्ये मंगळवारी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नऊ मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी सर्व आमदारांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. मात्र, कोटा येथील आमदार कवासी लखमा यांना शपथ वाचताही आली नाही. कवासी लखमा यांना शपथ घेण्यासाठी मंचावर बोलावण्यात आले. प्रथेनुसार राज्यपाल सुरुवातीच्या काही शब्द बोलतात, त्यानंतर संबंधित आमदार पुढील शपथ स्वत:च वाचतात. मात्र, कवासी लखमा हे शाळेतच न गेल्यामुळे त्यांना लिखित शपथ वाचता येणे शक्य नव्हते. अखेर राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यामागोमाग प्रत्येक वाक्य उच्चारत त्यांनी आपली शपथ पूर्ण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९५३ साली सुकमा जिल्ह्यातील नागारास गावात कवासी लखमा यांचा जन्म झाला. त्यांनी कधीही शाळेचे तोंड बघितले नाही. सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहासाठी ते शेती करायचे. मात्र, छत्तीसगढ राज्याच्या निर्मितीनंतर ते आमदार झाले. तेव्हापासून ते कोटा मतदारसंघातून कायम जिंकत आले आहेत. लखमा अशिक्षित असले तरी त्यांनी आतापर्यंत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर असे अनेक परदेश दौरे केले आहेत. 


मंत्र्यांना शपथ न वाचता आल्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. २०१५ साली महाआघाडी सरकारच्या शपथविधीवेळी लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजप्रताप यादव हेदेखील शपथ वाचू शकले नव्हते. 


दरम्यान, मंगळवारी झालेल्या या सोहळ्यात कवासी लखमा यांच्यासह रवींद्र चौबे, मोहम्मद अकबर, जय सिंह अग्रवाल, शिव डहरिया, महिला विधायक अनिला भेड़िया, रुद्र गुरु, प्रेमसाय सिंह टेकाम आणि उमेश पटेल यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.