नवी दिल्ली: औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्च्यातील तरुणाच्या मृत्यूनंतर मराठा संघटना प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाने कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन गेले. मात्र, इतके दिवस शांततेच्या मार्गाने मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाच्या भावना तीव्र का झाल्या, याचा विचारही राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे, असे संभाजीराजे यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परिस्थितीत मराठा समाजाला शांत करायचे असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागतील. प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडणे, ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. त्याऐवजी मराठा समाजाच्या लोकांना समोरासमोर बसवून त्यांच्या भावना समजवून घेतल्या पाहिजेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि सध्याची वेळ ही खूप नाजूक आहे. त्यामुळे ही परिस्थिती विचारपूर्वक हाताळली पाहिजे, अशी भावना छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली.


दरम्यान, उद्या मराठा संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्र बंद राहील, असा निर्धार मराठा संघटनांनी केला आहे. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, ही मागणीही मराठा संघटनांकडून लावून धरली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी याविषयी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.