Crime News : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) महासमुंद जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबातील सदस्याने हे हत्याकांड (Chhattisgarh Crime) घडवल्याचे समोर आले आहे. आई-वडील आणि आजीची हत्या केल्याप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने तिघांच्या हत्येनंतर मृतदेह सॅनिटायझरने (sanitizer) जाळण्याचा प्रयत्न केला. यासोबत तिघांच्या गायब होण्याची तक्रार देखील पोलीस ठाण्यात नोंदवली होती. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई वडिल आणि आजीची हत्या निर्घृण हत्या...


शिक्षक प्रभात भोई, त्यांची पत्नी सुलोचना भोई आणि आई झरना भोई अशी मुलांची नावे आहेत. तर उदित भोई (24) असे आरोपीचे नाव आहे. पैसे आणि अनुकंपातत्वार मिळणाऱ्या नोकरीच्या (compassionate job) लालसेपोटी उदित भोईने तिघांची हत्या केल्याचे समोर आले आहे. यातून वाचण्यासाठी उदितने आई-वडील आणि आजी बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने उदितची चौकशी करण्यात आली. या चौकशीतून उदितनेच आई वडिल आणि आजीची हत्या केल्याचे समोर आले आहे. यानंतर फॉरेन्सिक टीमने उदितच्या घराची झडती देखील घेतली होती.


प्रभात भोई (52) हे सरायपाली ब्लॉकमधील पुटका गावचे रहिवासी होते. ते पाकिन येथील उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. प्रभात यांना उदित आणि अमित ही दोन मुले होती. अमित पं. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, रायपूर येथून एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तर उदित बेरोजगार होता. यामुळेच उदित त्याच्या आई-वडिलांकडे सातत्याने पैशांसाठी भांडण करायचा.


असा रचला हत्येचा कट


वडिलांकडून पैसे मिळवण्यासाठी उदितने त्यांची हत्या करण्याचे ठरवले.  उदितने वडिलांची हत्या करून त्यांच्या जागी अनुकंपातत्वार नियुक्ती मिळवण्याचा कट रचला. मात्र यामध्ये उदितची आई आणि आजी अडचण ठरत होत्या. त्यामुळे त्याने तिघांनाही संपवण्याचा कट रचला. यासाठी 7 मे रोजी उदितने पैशावरून भांडण काढले. रात्री दोन वाजता उदितने हॉकी स्टिकने हल्ला करून तिघांची हत्या केली. त्यानंतर उदितने त्यांचे मृतदेह बाथरूममध्ये नेऊन ठेवले आणि दुसऱ्या दिवशी घराच्या पाठीमागील अंगणात लाकूड आणि सॅनिटायझरने जाळले. उदित तीन दिवस सॅनिटायझर टाकून मृतदेह हळूहळू जाळत होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.


भावाच्या पायाखालची जमिन सरकली


या सर्व प्रकारानंतर उदितने पोलिसांत जाऊन कुटुबियांच्या गायब होण्याची तक्रार दिली. 8 मे रोजी तिघेही रायपूरला उपचारासाठी गेले होते, असे उदितने पोलिसांना सांगितले होते. उदित त्याच्या वडिलांच्या नंबरवरून त्याचा भाऊ आणि नातेवाईकांना आम्ही परत येणार असल्याचे मेसेज पाठवत होता. त्याचवेळी अमित गावी परतला. मात्र घराला टाळा लावला होता. अमितने भींतीवरुन उडी मारून घरात प्रवेश केला. 
मात्र घरातील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. घराच्या अंगणात अमितला मानवी हाडे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. याची माहिती अमितने तात्काळ पोलिसांना दिली.


दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदितच्या घरातून धूर निघताना दिसल्याचे गावातील लोकांनी सांगितले. आरोपी उदित अनुकंपातत्वावरील नोकरीची माहितीही लोकांकडून घेत होता, असेही गावकऱ्यांनी सांगितले. उदितचे घर वस्तीपपासून दूर असल्याने याची माहिती कोणालाही मिळाली नाही.