Chhattisgarh Crime : छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh News) काही दिवसांपूर्वी झालेल्या एका व्यक्तीच्या हत्येला वेगळं वळण लागलं आहे. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील उर्जा नगर येथे काही दिवसांपूर्वी घरात घुसून एसईसीएल कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती. आता हत्येचे गूढ छत्तीसगड पोलिसांनी (Chhattisgarh Police) उकलले आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून मृताची पत्नीच असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे. 50 हजार रुपयांची सुपारी देऊन पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी लग्नाच्या 10 व्या वाढदिवशीच ओळखीच्या व्यक्तीला 50 हजार रुपयांची सुपारी देऊन महिलेने पतीची हत्या केल्याची भीषण घटना घडली होती. आरोपीने पतीवर कुऱ्हाडीने अनेक वार करून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह दोन जणांना अटक त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


ऊर्जानगरच्या एसईसीएल वसाहतीत राहणाऱ्या जगजीवन राम रात्रे (32) याची बुधवारी रात्री दोनच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. गुरुवारी जगजीवनच्या लग्नाचा वाढदिवस होता. रात्री कोणीतरी येऊन तुझ्या भाऊजीचा खून केल्याची माहिती जगजीवनच्या पत्नीने त्याच्या भावाला दिली होती. घाबरून मी माझ्या दोन्ही मुलांसह खोलीत लपून बसले होते असेही पत्नीने त्याच्या भावाला सांगितले. जगजीवनच्या पत्नीने पोलिसांनाही काही लोक आले आणि पतीला मारून निघून गेले. खून करणारे लोक जगजीवनच्या ओळखीचे होते, असेच सांगितले. त्यानंतर दिपका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.


प्रकरणाचे गांभीर्य पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा खोलवर तपास करण्याचे ठरवले आणि एक पथक घटनास्थळी पाठवून दिले. यासोबतच बिलासपूर येथील फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, पोलीस जगजीवनच्या पत्नीची चौकशी करतच होते. मला भीती वाटल्याने मी काही करु शकले नाही, असे ती म्हणत होती. यासोबत वारंवार आपला जबाब बदलत होती. त्यामुळे पोलिसांनाही पत्नीवर संशय आला.


शेवटी पोलिसांच्या चौकशीसमोर पत्नी टिकू शकली नाही आणि तिने सत्य सांगितले. आपणच एका व्यक्तीच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली पत्नीने दिली. मी कृष्णा नगर येथील तुषार (21) उर्फ ​​गोपी याला पतीला मारण्याची सुपारी दिली होती. मी त्याला 6 हजार अॅडव्हान्स दिले होते. नंतर आणखी 44 हजार द्यायचे होते. यासाठी दागिनेही विकले, अशी माहिती आरोपी पत्नीने पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ आरोपी पत्नी आणि तुषार याला अटक केली.


अशी झाली हत्या...


आरोपी तुषारने सांगितले की, "मी आधी दार ठोठावून जगजीवनकडे पाणी मागितले. मग त्याला म्हणाले, मला तुझ्या बायकोबद्दल बोलायचे आहे असे म्हणत मी घरात गेला. मग तो पाणी आणयला गेला तेव्हा मी त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले आणि ठार मारले. ही घटना घडली त्यावेळी जगजीवनची पत्नी तिथे उभी राहून सर्व काही पाहत होती." 


म्हणून जगजीवनला संपवलं


पत्नीने चौकशीत सांगितले की, "24 मे 2013 रोजी आमचे लग्न झाले होते. लग्नानंतर जगजीवन दारू पिऊन भांडण करायचा. खूप मारायचा देखील. म्हणून मी जगजीवनला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी कृष्णा नगर येथे राहणाऱ्या तुषार सोनी याला पैशाचे आमिष दाखवून जगजीवनचा खून करण्यास सांगितले."