नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याविरोधात तपासयंत्रणांकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. केवळ सुडाच्या राजकारणापोटी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. हा प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. ते गुरुवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी पी. चिदंबरम यांच्या अटकेवरून केंद्र सरकार आणि तपासयंत्रणांवर ताशेरे ओढले. तपासयंत्रणांना अजूनही चिदंबरम यांच्याविरोधात भक्कम खटला उभारता आलेला नाही. त्यांच्यावर आरोपपत्रा दाखल करण्यासाठीही पुरेसे पुरावे नाहीत. सरकारकडून राजकीय विरोधकांवर केवळ खोटे आरोप लावले जात आहेत. आपण एक देश म्हणून याकडे केवळ पाहत राहण्यापेक्षा आवाज उठवला पाहिजे. तपासयंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांच्या घरात भिंतीवरून चढून प्रवेश केला. मात्र, चिदंबरम यांच्याविरोधात एकही पुरावा न सापडल्यास नरेंद्र मोदी आणि अमित शहांना ते सांगण्याची हिंमतही या अधिकाऱ्यांमध्ये असावी, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो.


देशाची अर्थव्यवस्था गर्तेत जात असल्यामुळेच मोदी सरकार जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हा खटाटोप करत आहे. यावरून एक सिद्ध होते की, मोदी सरकार सुडाचे राजकारण खेळत आहे. आता हे सरकार आणखी किती खालची पातळी गाठणार, हेच आम्हाला पाहायचे असल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले. 


दरम्यान, आज सीबीआयच्या मुख्यालयात पी. चिदंबरम यांची चौकशी होईल आणि यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. तत्पूर्वी काल अटक केल्यानंतर रात्रभर पी. चिदंबरम यांना सीबीआयच्या मुख्यालयात ठेवण्यात आले होते. याठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.


न्यायालयातील आजच्या सुनावणीवेळी सीबीआयकडून पी. चिदंबरम यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. जेणेकरून त्यांची नीट चौकशी करता येईल. तर चिदंबरमही आज जामिनासाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे न्यायालय काय निकला देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.