१०६ दिवसांच्या तुरुंगवासानंतर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर
पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्टला सीबीआयने ताब्यात घेतले होते.
नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर केला. पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्टला सीबीआयने ताब्यात घेतले होते. पी. चिदंबरम यांच्या अटकेला १०६ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायमूर्ती आर. भानूमथी यांच्या खंडपीठाने २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर चिदंबरम यांना जामीन मंजूर केला. तुरुंगाबाहेर आल्यानंतर चिदंबरम यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच चिदंबरम यांनी पुराव्यांशी छेडछाड किंवा साक्षीदारांवर दबाव टाकू नये, असेही न्यायालयाने बजावले आहे. जामीन मंजूर झाल्यामुळे पी. चिदंबरम आजच तुरुंगाबाहेर येतील.
देवाक काळजी रे... पी. चिदंबरम यांचा भाजपला टोला
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की, चिदंबरम यांना १०६ दिवस तुरुंगात डांबण्याची कृती खुनशी आणि सुडापोटी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला ही आनंदाची गोष्ट आहे. कायद्याला धरून या प्रकरणाची सुनावणी झाल्यास पी. चिदंबरम आपले निर्दोषत्व सिद्ध करतील, अशी आशा मी करत असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले.
पी. चिदंबरम यांना झालेली अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का होता. या काळात पी. चिदंबरम यांनी जामीनासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने वेळोवेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीला मुदतवाढ दिली होती. या काळात सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तिहार तुरुंगात जाऊन पी. चिदंबरम यांनी भेट घेतली होती.