`जर पेजरमध्ये स्फोट होऊ शकतो, तर मग EVM हॅक का होऊ शकत नाही?,` निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं
Maharashtra Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्तांनी पेजर हॅकसारख्या मुद्द्यांची ईव्हीएमशी केल्या जाणाऱ्या तुलनांवर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की, पेजर बॅटरीशी जोडलेला असतो, मात्र ईव्हीएम नाही.
Maharashtra Election Commission: निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकाच्या तारखांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दोन्ही राज्यात 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान, निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएमशी संबंधित प्रश्नांची उत्तरं दिली. हरियाणामधील निवडणुकीत ईव्हीएमशी संबंधित ज्या तक्रारी आल्या होत्या त्यांची आम्ही उत्तरं देऊ असं त्यांनी सांगितलं. आम्ही प्रत्येक तक्रारीचं उत्तर देऊ आणि लेखी सांगू. ईव्हीएमची एकदा नाही तर चार वेळा तपासणी केली जाते. ईव्हीएमची निवड झाल्यानंतर त्यात बॅटरी टाकली जाते. मतदानाच्या 5-6 दिवस आधी त्यात निवडणूक चिन्हं टाकली जातात. बॅटरीवरही एजंटची स्वाक्षरी असते. ईव्हीएम जिथे ठेवले जातात तिथे तीन लेअरची सुरक्षा असते अशी माहिती त्यांनी दिली.
'पेजर हॅक होऊ शकतं, तर मग ईव्हीएम का नाही'
मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी पेजर हॅकची ईव्हीएमशी केल्या जाणाऱ्या तुलनेवरही उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की, पेजर बॅटरीशी जोडलेला असतो, पण ईव्हीएम नाही. राजीव कुमार म्हणाले की, "काही लोक तर असंही म्हणतात की, जर पेजरचा स्फोट घडवला जाऊ शकतो तर मग ईव्हीएम हॅक का केलं जाऊ शकत नाही? अशा लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की, पेजर कनेक्टेड असतो, पण ईव्हीएम नाही". निवडणुकीच्या आधी पोलिंग एजंट्सच्या उपस्थितीत त्यात काही छेडछाड तर करण्यात आलेली नाही ना याची तपासणी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मतदानाच्या 5 ते 6 दिवस आधी ईव्हीएम सुरू होतात, असं निवडणूक आयुक्तांनी सांगितले. त्यादरम्यान त्यात एक बॅटरी आणि चिन्हे टाकली जातात. त्यानंतर ईव्हीएम सील केले जाते. ईव्हीएमच्या बॅटरीवरही उमेदवाराच्या एजंटची सही असते. निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की, हा बॅटरीसारखा मोबाईल नाही, यामध्ये कॅल्क्यूलेटरप्रमाणे एकल वापर बॅटरी असते. कार्यान्वित झाल्यानंतर ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येतात. त्यावर दुहेरी कुलूप आहे. थ्री लेयर सिक्युरिटी आहे.
जेव्हा ईव्हीएम मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचतात, तेव्हा तीच प्रक्रिया पुन्हा केली जाते. यादरम्यान व्हिडीओ शूट केलं जातं. कोणत्या क्रमांकाची मशीन कोणत्या बूथवर जाणार हे ठरवलं जातं. त्याचा रेकॉर्ड ठेवला जातो. एजंट्सला मशीनमध्ये मत टाकून दाखवलं जातं.