पत्नीचे दागिने विकून निवडणुकीचा खर्च भागवता? कमलनाथांचा भाजप नेत्यांना सवाल
पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकिकडे विरोधी पक्षनेत्यांकडून जातीच्या राजकारणाचे आरोप करण्यात येत असतानाच दुसरीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. आपल्या शैलीत त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. कमलनाथ यांचे प्रश्न आणि त्यांचं वक्तव्य येत्या काळात आणखी एका नव्या वादाला तोंड फोडण्यास कारणीभूत ठरु शकतं.
'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भादप नेत्यांकडे निवडणूक प्रचारासाठीचा निधी हा त्यांच्या पत्नीच्या दागिन्यांची विक्री केल्यानंतर येतो का, असा आक्षेपार्ह प्रश्न कलमनाथ यांनी मांडला. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही एक प्रश्न केला. 'मी मोदींना विचारु इच्छितो की, त्यांच्या विमान प्रवासासाठी खर्च केले जाणारे पैसे, मध्य प्रदेश विधानसभा निवडणूतांसाठी खर्च करण्यात आलेले पैसे आणि आता लोकसभा निवडणूकांवर खर्च केला पैसे नेमके येतात कुठून? निवडणूक निधीची सोय करण्यासाठी आणि हा सारा खर्च भरुन काढण्यासाठी भाजप नेत्यांच्या पत्नी त्यांच्या दागिन्यांची विक्री करतात का?', असा बोचरा प्रश्न कमलनाथ यांनी उपस्थित केला.
कमलनाथ यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर आता भाजप नेते किंवा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देशात सध्या सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांमध्ये कमालीचे मतभेद आणि आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जातीच्या राजकारणाचाही मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे. त्यामुळे एकंदरच ही परिस्थिती कोणत्या निकाली निघणार, याकडे साऱ्या देशाच्याच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय राजकीय विश्वाच्याही नजरा लागलेल्या आहेत.