किती वाईट! तीन मुलं असूनही 80 वर्षांची माऊली भरपावसात शोधत होती आसरा; मन सुन्न करणारी घटना
Children Left Elderly Mother: दोन मुलं आणि एक मुलगी तरीही माऊलीवर रस्त्यावर भटकण्याची वेळ आली आहे. मात्र, वृद्ध माऊलीसाठी खाकी वर्दीतील देवमाणसं धावून आले आहेत.
Children Left Elderly Mother: वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे, त्यांची काळजी घेणे हे मुलांचे कर्तव्य असते. पण अनेकदा मुलं कामाला लागली की किंवा स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर आई-वडिलांची जबाबदारी झटकतात. असाच एक प्रकार एका 80 वर्षांच्या वृद्ध महिलेसोबत घडला आहे. या वृद्ध महिलेले दोन मुलं आणि एक मुलगी आहेत. पोटची तीन मुलं असूनही आईला सांभाळण्यासाठी एकही मुलगा तयार होईना. शेवटी या माऊलीला रस्त्यावर भटकण्याची वेळ आली आहे. मात्र, या महिलेच्या मदतीसाठी खाकी वर्दीतील देवमाणूसं धावून आले आहेत. पोलिसांनी तिला पोटभर जेवण खाऊ घातलं आहे. त्यानंतर तिच्यावर योग्य उपचार करुन तिला वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कृष्णानगर क्षेत्रातील परिसरात ही वृद्ध महिला मुसळधार पावसात भटकत होती. सतत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याचवेळी परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. त्यानंतर इन्सपेक्टर विक्रम सिंह हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेला जेवण देऊ केले आणि डॉक्टरांकडे उपचारांसाठी घेऊन गेले. त्यानंतर महिलेची चौकशी केल्यानंतर तिने सांगितलेले सत्य ऐकून पोलिसही सून्न झाले. त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही जेव्हा पहिल्यांदा त्या माऊलीला पाहिलं तेव्हा ती रडत रडत भरपावसात आसरा शोधत फिरत होती. तिचे अवस्था पाहवत नव्हती. आम्ही तिच्या मुलांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र काहीच संपर्क होत नव्हता. शेवटी आम्ही आधी त्यांना योग्य उपचार दिले. मगच त्यांची चौकशी केली.
या वृद्ध महिलेला दोन मुलं आणि एक मुलगी असून तिचे नाव रामबेटी मिश्रा असं आहे. तिचे पती बहादुर मिश्रा यांचे निधन झाले आहे. तर, हरदोई जिल्ह्यातील खरजुरहा गावातील रहिवासी आहे. रामबेटी यांच्या तिन्ही मुलांची लग्न झाली आहेत. कित्येक वर्षांपासून ती मुलांसोबतच एका घरात राहत होती. मात्र, एकदिवस अचानक तिच्या मुलांनी तिला घराबाहेर काढले. त्यामुळं ती दिवसरात्र भरपावसात भटकत होती. पोलिसांनी तिच्या मुलीसोबत संपर्क साधून आईची परिस्थिती सांगितली. मात्र, मुलीनेही आईला सांभाळण्यास नकार दिला.
पोलिसांनी रामबेटी यांच्या दोन मुलांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची चौकशी केली असता दोन्ही मुलांनी वडिलोपार्जित संपत्ती विकून कुठेतरी निघून गेले होते. सगळा प्रकार ऐकून पोलिसांचेही मन हेलावले. अखेर त्यांनी या वृद्ध महिलेला वृद्धाश्रमात दाखल केले आहे.