Earthquake : चीनमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्लीपर्यंतची धरणी हादरली; घटनास्थळाची दृश्य भीतीदायक!
China earthquake : चीनमध्ये आलेल्या भूकंपाचे परिणाम भारतातही दिसले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Earthquake News : चीनमध्ये (China Earthquake) पुन्हा एकदा प्रचंड भूकंपानं हाहाकार माजवला असून, येथील धरणी पुन्हा हादरल्याचं वृत्त सोमवारी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आलं. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार चीनमध्ये सोमवारी 7.2 रिश्टर स्केल इतक्या प्रचंड तीव्रतेचा भूकंप आला. नेपाळ-चीन सीमेनजीक या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात आलं. हा भूकंप इतका मोठा होता, की त्याची कंपनं जाणवू लागताच नागरिकांनी जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळ काढत मोकळ्या जागेवर येण्यास सुरुवात केली. चीनमध्ये आलेल्या या महाभयंकर भूकंपाचे थेट परिणाम भारतापर्यंत जाणवले असून, इथं दिल्ली - एनसीआर भागामध्येही धरणी हादरल्याचं वृत्त समोर आलं.
नेमका कुठे आला भूकंप?
चीनमधील सरकारी वृत्तवाहिनी शिन्हुआनं दिलेल्या माहितीनुसार पश्चिमी शिनजियांग या चीनमधील प्रांतापासून काहीसं दूर असणाऱ्या भागामध्ये 7.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला. स्थानिक वेळेनुसार रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा भूकंप आला. ज्यामुळं अक्सू भागातील वुशू काऊंटीमध्ये भूकंपाचे प्रचंड हादरे जाणवले. भूकंपानंतरही या भागांमध्ये आफ्टर शॉक्स जाणवत राहिले, ज्यांची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी होती.
अमेरिकन भूगर्भशास्त्र सर्वेक्षणाच्या माहितीनुसार चीनच्या तियान शान पर्वतरांगेमध्ये सर्वप्रथम हा भूकंप आला. या भूकंपाचे परिणाम किर्गिस्तान आणि कझाकिस्तान या शेजारी राष्ट्रांसह भारततही दिसून आले. पूर्वी म्हणजेच 1978 मध्ये याच भागापासून साधारण 200 किमी उत्तरेलाही 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता.
हेसुद्धा वाचा : Maratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या
भूकंप येण्यामागची मुख्य कारणं काय?
पृथ्वीच्या उदरामध्ये सात वेगवेगळे पदर असून, हे पजर सातत्यानं मागेपुढे होत असतात. ज्यावेळी पृथ्वीच्या गर्भात असणाऱ्या या थरांपैकी काही थर एकमेकांवर आदळतात तेव्हा त्यांच्यामध्ये उर्जा निर्माण होते आणि धरणीमध्ये कंपनं जाणवू लागतात. भूकंप आल्यास त्याची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते. 1 ते 9 अशा प्रमाणात या भूकंपाची तीव्रता मोजता येते. ही तीव्रता म्हणजे भूकंपातून निर्माण होणारी उर्जा असते. 7 रिश्टर स्केलचा भूकंप आल्यास त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या 40 किलोमीटरच्या भागामध्ये या भूकंपाचे परिणाम जाणवू शकतात.