नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्ब्ल यांनी नागरिकत्व संशोधन विधेयकावर (CAB) आपल्या पक्षाची भूमिका मांडली. नागरिकत्व विधेयक देशाच्या संविधान आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांविरुद्ध असल्याचं सांगत, काँग्रेसनं या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे. भाजप सरकार संविधानाचा पायाच हलवत आहे. संविधानाचा धुरळा उडवला जातोय, असंही यावेळी कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं, काँग्रेसनं धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन केलं म्हणून आम्हाला हे विधेयक आणावं लागलंय... मला प्रश्न पडलाय की गृहमंत्र्यांनी कोणत्या लेखकाचं, कोणतं पुस्तक वाचलंय... 'टू नेशन थिअर' सावरकरांनी दिली होती, असं कपिल सिब्बल यांनी संसदेत म्हटलं. आपल्या वक्तव्याबद्दल गृहमंत्र्यांनी माफी मागावी अशीही कपिल सिब्बल यांनी मागणी केली. काँग्रेसनं नेहमीच 'वन नेशन' थिअरी मान्य केलीय, असंही त्यांनी म्हटलं. 


होय, हे ऐतिहासिक विधेयक आहे, पण तुम्ही आपला इतिहास बदलत आहात म्हणून हे ऐतिहासिक विधेयक ठरेल.... मोदींनी 'सबका साथ' कधीच गमावलीय... गृहमंत्रीही देशाचं भविष्य बिघडवत आहेत, असं म्हणत सिब्बल यांनी भाजप सरकारवर टीका केली. 



'एक चुकीचं वक्तव्य गृहमंत्र्यांनी केलं... ते म्हणाले देशातील मुसलमानांनी घाबरण्याचं कारण नाही... हा केवळ एका समुदायावर हल्ला आहे. मी सांगू इच्छितो, ना मी तुम्हाला घाबरत, ना देशाचे नागरिक, ना देशातील मुसलमान... आम्ही जर कुणाला घाबरत असू तर ते संविधान आहे... ज्याला तुम्ही धुळीत मिळवत आहात' असं म्हणत सिब्बल यांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला.