नवी दिल्ली : पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरच्या सीमेलगतच्या परिसरात काल संध्याकाळी विनाकारण केलेल्या गोळीबार आणखी एक नागरिकाचा मृत्यू झालाय. 


१२ जणांचा मृत्यु झालाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारपासून पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनात ७ नागरिकांसह १२ जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी आहेत. काल संध्याकाळी पाकिस्तानी लष्करानं जम्मूच्या अखनूर, कानचक, राजौरी आणि पुंछ सेक्टरमध्ये तोफांचा मारा सुरू केला. त्याला भारतीय सैन्यानं चोख उत्तरही दिलं. पण पाकिस्तानच्या बाजूनं करण्यात आलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. 


तोफगोळ्यांचा वर्षाव


नियंत्रण रेषेवरील भवानी, कारली या गावांवरही पाकिस्तानी लष्करानं तोफगोळ्यांची वर्षाव केल्याचं लष्करी सूत्रांनी म्हटलंय. 


‘पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू’


पाकिस्तानने त्यांच्या कुरापती थांबवल्या नाहीत तर पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू, असा सज्जड दम केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलाय. सीमेलगत पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. या कुरापतींना आम्ही जशास तसं उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला. 


‘सीमेवर एक प्रकारे रक्ताची होळी’


पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर युद्धसदृश वातावरण निर्माण झालंय. सीमेवर एक प्रकारे रक्ताची होळी खेळली जात असल्याची खंत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केली.


जम्मू काश्मीरला युद्धाचा आखाडा बनवू नका. भारत-पाकिस्तानमध्ये मैत्रीचा सेतू निर्माण करा असं आवाहन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना केलं. बारामूला येथे पोलीस कॉन्स्टेबल पासिंग आऊट परेडला संबोधित करताना मेहबूबा मुफ्ती यांनी हे आवाहन केलं.