नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या बदरपूर भागातील एनटीपीसी स्थित केंद्रीय विद्यालयात एका विद्यार्थ्यावर ब्लेडनं वार करण्यात आलेत. धक्कादायक म्हणजे, किरकोळ भांडणावरून त्याच्या काही शाळेतील मित्रांनीच या मुलावर हा हल्ला केलाय. ब्लेडच्या हल्ल्यात या विद्यार्थ्याच्या पाठीवर गंभीररित्या जखमा झाल्यात. त्याला तातडीनं हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याच्या पाठीवर टाके घालावे लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज एजन्सी एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी सातवीच्या वर्गात एकत्रच शिकत आहेत. शुक्रवारी एकाच सीटवर बसण्यासाठी दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर एका विद्यार्थ्यानं दुसऱ्या विद्यार्थ्याला ब्लेडनं मारण्याची धमकी दिली आणि तसं त्यानं केलंही. 


मधल्या सुट्टीत पीडित मुलगा बाथरुममध्ये गेला असताना आरोपी विद्यार्थी आणि त्याच्या एका मित्रानं आपल्या मित्रांसोबत त्याच्यावर हल्ला केला. 


ही घटना शिक्षकांच्या कानावर गेली असता अगोदर त्याच्यावर शाळेतल्याच मेडिकल रुममध्ये प्रथमोपचार करण्यात आले. परंतु, तरीही रक्त थांबेना म्हणून शिक्षकांनी त्याला जवळच्याच एका डिस्पेन्सरीमध्ये दाखल केलं. इथून डॉक्टरांनी त्याला एम्स ट्रामा हॉस्पीटलमध्ये हलवलं. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याच्या पाठीवर २५ हून अधिक टाके घालावे लागलेत.


विद्यार्थ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आपल्या भांडणाची माहिती त्यानं शिक्षकांच्या कानावर घातली होती. परंतु, शिक्षकांनी त्यावर फारसं लक्ष दिलं नाही. पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, शिक्षकांनी योग्यवेळीच हस्तक्षेप केला असता आणि धमकी दिल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याला समजावलं असतं तर एवढी मोठी घटना घडलीच नसती. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतलीय आणि अधिक तपास सुरू आहे.