विरोधासाठी ही योग्य वेळ नाही, अमरिंदर सिंग यांच्याकडून गांधी कुटुंबाचे समर्थन
काँग्रेसमध्ये आता २ गट पडत असल्याचे चित्र आहे.
नवी दिल्ली : संघटना पातळीवर बदल करण्यावरुन काँग्रेसमध्ये सध्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेस पक्ष याबाबतीत दोन गटात विभागला गेला आहे. एक गट पक्ष नेतृत्वासह संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्याची मागणी करत आहे तर दुसरीकडे गांधी कुटुंबाला आव्हान देणे चुकीचे असल्याचे एका गटाने म्हटले आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील गांधी घराण्याच्या नेतृत्वाला आव्हान देणार्या काही काँग्रेस नेत्यांच्या मागणीला विरोध दर्शविला आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं की, 'असे मुद्दे उपस्थित करण्याची ही वेळ नाही. सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारविरूद्ध तीव्र विरोध आवश्यक आहे, ज्यांनी देशातील घटनात्मक आणि लोकशाही तत्त्वांचा नाश केला आहे.'
रविवारी जाहीर केलेल्या निवेदनात कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, विरोधी पक्ष एकत्र नसल्यामुळे एनडीए यशस्वी आहे. संकटांच्या या काळात पक्षात मोठ्या फेरबदलाची मागणी करण्याची ही योग्य वेळ नाही. अशी पावले पक्ष आणि देशाच्या हितासाठी हानिकारक ठरतील.
अमरिंदर सिंह म्हणाले की,' भारताला केवळ सीमेच्या पलीकडूनच नाही अंतर्गत धोक्यांचा देखील सामना करावा लागत आहे. ते म्हणाले की, एकत्र काँग्रेसच देश व लोकांचे रक्षण करण्यास सक्षम आहे.'
काँग्रेसच्या नेतृत्व बदलाचा मुद्दा अस्थिर असल्याचे म्हणत कॅप्टन अमरिंदर यांनी ब्रिटीशांच्या राजवटीपासून ते स्वातंत्र्यानंतर ही गांधी परिवाराच्या देशाच्या प्रगतीमध्ये असलेल्या योगदानाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 'काँग्रेसला अशा नेतृत्वाची गरज आहे जे केवळ काही लोकांना मान्य नसून पक्षाच्या सर्व सदस्यांनी त्यांना स्वीकारले पाहिजे.'
या भूमिकेसाठी कॅप्टन अमरिंदर यांनी राहुल गांधींना यासाठी योग्य म्हटले आहे. ते म्हणाले की, सोनिया गांधींनी त्यांना हवे तोपर्यंत काँग्रेसचे नेतृत्व करत राहिले पाहिजे. पण राहुल गांधींनी देखील पक्षाची कमान घ्यायला तयार असले पाहिजे.
अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणेच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही पक्षातील फेरबदलास विरोध दर्शविला आहे. संजय निरुपम यांनी रविवारी ट्विट केले की, 'हे पत्र राहुल गांधींच्या नेतृत्वात खोटे बोलण्याचे नवीन षड्यंत्र आहे. बंद खोल्यांमध्ये उधळलेला कट रचला गेला आहे. त्याला एकच उत्तर आहे, राहुल गांधींजी आता अध्यक्ष न होण्याची जिद्द सोडून द्या आणि काँग्रेसच्या कोसळत्या भिंती वाचवा. केवळ तेच काँग्रेसला वाचवू शकतात.'
सोनिया गांधी यांना पत्र
काँग्रेसमधून निलंबित पक्षाचे प्रवक्ते संजय झा यांनी बिगर गांधी कुटुंबातील कोणीतरी काँग्रेस अध्यक्ष व्हावे अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, बिगर गांधी काँग्रेस अध्यक्षांची शक्यता शोधण्याची वेळ आली आहे. संजय झा यांनी असा दावा केला आहे की, 10 जनपथवर पक्ष संघटनेत पूर्ण बदल करण्याची मागणी करणारे पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रावर 300 नेत्यांनी सही केली आहे. मोदी सरकारला आव्हान देण्यास पक्षाच्या अपयशामुळे चिंतित संजय झा यांच्या मते, पक्ष बदलण्यासाठी या नेत्यांनी सामूहिक प्रयत्न सुरू केले आहेत.'
काँग्रेस कार्यकारिणीत चर्चेशी शक्यता
काँग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) सोमवारी बैठक होणार आहे. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत हा विषय येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. सीडब्ल्यूसी सदस्य, पक्षाचे खासदार आणि माजी मंत्र्यांसह पक्षाच्या महत्त्वाच्या 23 नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेस संघटनेत बदल करण्याची मागणी केली आहे. बैठकीत संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा होईल. हे पत्र सीडब्ल्यूसी बैठकीच्या केंद्रस्थानी राहील अशी चर्चा आहे.