मुख्यमंत्री म्हणाले, `ही पक्षाच्या गरीब उमेदवार`; महिला निघाली 161 कोटींची मालकीण! राज्यभर चर्चा
Poor Candidate Own Rs 161 Crore Property: काही दिवसांपूर्वीच झालेल्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या महिला उमेदवाराचा उल्लेख `गरीब उमेदवार` असा केला होता. त्यानंतर या महिलेने सादर केलेल्या उमेदवारी अर्जाबरोबरील संपत्तीचा तपशील पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Poor Candidate Own Rs 161 Crore Property: लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच देशातील काही ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुकाही पार पडणार आहेत. यापैकीच एक मतदारसंघ आहे आंध्र प्रदेशमधील कुरनूल मतदारसंघ. या मतदारसंघातून येम्मिगनूर येथील व्हाएसआरसीपीच्या बुट्टा रेणुका यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. सध्या रेणुका चांगल्याच चर्चेत आहेत. रेणुका यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 161.21 कोटी रुपये इतकी असल्याचं उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व्हा. एस. जगन मोहन रेड्डी यांनी बुट्टा यांचा 'गरीब' असा उल्लेख केलेला.
अर्जाबरोबर दिला संपत्तीचा तपशील
माजी खासदार असलेल्या बुट्टा रोणुका यांनी आंध्र प्रदेशमधील कुरनूल जिल्ह्यात 13 मे रोजी होत असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाबरोबरच्या कागदपत्रांमधून त्यांच्या एकूण संपत्तीसंदर्भात खुलासा झाला आहे. या अर्जाबरोबर जोडण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन रेणुका आणि त्यांचे पती शिव नीलकंठ यांच्याकडे एकूण 142 कोटी 46 लाखांची जंगम संपत्ती आहे. तर 18 कोटी 75 लाखांची स्थावर संपत्ती या दांपत्याच्या नावावर आहे. हे दोघे एकूण 7.82 कोटी रुपयांचं देणं लागतात.
त्या एवढ्या श्रीमंत कशा काय?
रेणुका या एक उद्योजिका असून त्यांच्याकडे ऑटोमोबाईल डीलरशीप, हॉटेल, शैक्षणिक संस्थांची मालकी आहे. बुट्टा कनव्हेंशनची मालकीही त्यांच्याकडेच आहे. त्यांची संपत्ती हैदराबादमधील माधापूर आणि इज्जत नगर परिसरात आहे. या ठिकाणी त्यांच्या नावावर जमीनीचे अनेक तुकडे असून काही इमारतींची मालकीही त्यांच्याकडे आहे. 2014 मध्ये त्यांनी 242.62 कोटींची संपत्ती घोषित केली होती. त्यावेळी त्या सर्वात श्रीमंत खासदार ठरल्या होत्या.
पक्ष बदलला पण...
रेणुका कुरनूल लोकसभा मतदारसंघातून व्हाएसआरसीपीच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी तेलगू देसम पार्टीचे उमेदवार बी. टी, नायडू यांचा 44 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र नंतर त्यांनी टीडीपीमध्ये प्रवेश केला. पुन्हा 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी रेणुका व्हायएसआरसीपीमध्ये परतल्या. त्यांना टीडीपीमध्ये तिकीट नाकारण्यात आलं होतं.
नक्की वाचा >> 'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य
विरोधकांनी साधला निशाणा
कुरनूलमधील सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री जग्गन मोहन रेड्डी यांनी, रेणुका यांची संपत्ती मर्यादित असल्याचं विधान करत त्या आमच्या पक्षाच्या 'गरीब उमेदवार' असल्याचं म्हटलं होतं. "मुख्यमंत्र्यांनी रेणुका गरीब आणि गरजू असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला हे चुकीचं आहे. रेणुका यांची संपत्ती 250 कोटी इतकी आहे," असं टीडीपीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.