तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा २ आठवडे आणखी लॉकडाऊन वाढवण्याचा सल्ला
तेलंगणामध्ये १४ एप्रिलनंतर ही लॉकडाऊन लागू राहण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी १४ एप्रिलनंतर आणखी २ आठवडे लॉकडाउन कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पण याबाबत अजून कोणताही निर्णय़ झालेला नाही.
देशभरात २४ तासात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७०४ ने वाढली आहे. तसेच २८ लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे. एकाच दिवसात २८ जणांचा मृत्यू हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. आतापर्यंत देशात १११ लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशभरात ४२८१ जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. देशातील अनेक भागांमध्ये कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. १४ एप्रिलला लॉकडाऊन जरी हटवला गेला तरी हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी लॉकडाऊन हटवला नाही जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन हटवल्यानंतर ही देशात कलम १४४ लागू होण्याची शक्यता आहे.
देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. जोपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणं थांबत नाही, तो पर्यंत परिस्थिती नियंत्रणात येणार नाही. लोकांनी देखील सरकारच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. लॉकडाऊनच्या काळात घरात राहणं महत्त्वाचं आहे. कोरोनावर अजून कोणतीही लस नसल्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे.