दिल्लीची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल, मुख्यमंत्री केजरीवालांचा महत्त्वाचा निर्णय
दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला हा प्रस्ताव
नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, आम्ही लहान स्तरावरचा लॉकडाऊनचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. हे आंशिक लॉकडाउन असेल.
यासह सीएम केजरीवाल यांनी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विवाह सोहळ्याला येणार्या लोकांची संख्याही कमी करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. आता फक्त 50 लोक लग्न सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. सीएम केजरीवाल म्हणाले की, 'गर्दी वाढल्यास बाजारपेठा बंद केल्या जातील.'
दिल्तीत गेल्या 10 दिवसांत नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. दिवसाला 8000 पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. प्रदूषण, जास्त चाचणी, निष्काळजीपणा यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
यापूर्वी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले होते की, तिसऱ्या लाटेचा काळ संपला आहे, त्यामुळे लॉकडाऊनची गरज नाही. दिल्लीचे आरोग्यमंत्री म्हणाले की, आम्ही दिल्लीतील 29% लोकांची चाचणी केली आहे. घरात क्वारंटाईन झाल्याने प्रकरणे वाढत नाहीत. दिल्लीत कोरोनासाठी 16500 बेड आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये बेडची समस्या आहे कारण सर्व खाजगी रुग्णालयात जात आहेत.