कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस-जेडीएस सरकारवर राजकीय संकट आहे.
बंगळुरु : कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस-जेडीएस सरकारवर राजकीय संकट आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेडीएस आणि काँग्रेस सरकार संध्याकाळी 7 वाजता पडू शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी संध्याकाळी 7 वाजता कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेणार आहेत. यावेळी एचडी कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. विधानसभेत कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करायचं आहे. याआधी काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसचे 3 आमदारांनी राजीनामा दिला आहे. 2 अपक्ष आमदारांनी ही सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात आलं आहे. सरकार पडल्यानंतर भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळणार आहे.
कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी याआधी दणका दिला होता. कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी आमदारांना व्हीप बजावण्याचा अधिकार संबंधित पक्षाचा असल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे काँग्रेस आणि जेडीएसला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंडखोर आमदारांना व्हीप बाजावण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर सभागृहात पाइंट ऑफ ऑर्डरने काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी व्हीप बाजावण्याचा अधिकार पक्षाचा आहे की नाही हे स्पष्ट करावे अशी मागणी अध्यक्षांकडे केली होती.
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर आजच मतदान घेण्यासंदर्भात भाजपला पाठिंबा दिलेल्या दोन अपक्षांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात आजच सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं या अर्जावर तात्काळ निर्णय घेता येणार नाही. उद्या आपण या संदर्भात निर्णय देऊ असं सांगितलं आहे.
याआधी काँग्रेसचा मुख्यमंत्री करुन बंडखोर आमदारांची नाराजी दूर करण्याचा डाव काँग्रेसकडून खेळला जाईल अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर काही आमदार राजीनामा मागे घेतील असं काँग्रेसला वाटतं आहे. पण यासाठी कुमारस्वामी यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागणार आहे.