रायपूर: भीष्म पीतामह यांच्याप्रमाणे आमच्या मुख्यमंत्र्यांनाही 'इच्छामरणा'चे वरदान प्राप्त आहे, अशी मुक्ताफळे भाजपचे आमदार अजय चंद्रकार यांनी उधळली आहेत. त्यामुळे भाजपमधील वाचाळवीर नेत्यांच्या यादीत आता आणखी एका नव्या नावाची भर पडली आहे. अशा वाचाळवीरांमुळे सरकार आतापर्यंत अनेकदा अडचणीत आले आहे. पंतप्रधान मोदींनी मध्यंतरी अशा वाचावळवीरांना जिभेला लगाम घालण्याचे आदेश दिले होते. मात्र, भाजप नेत्यांचा वाचाळपणा काही थांबलेला नाही. 


छत्तीसगढमध्ये शुक्रवारी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमादरम्यान याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. यावेळी मुख्यमंत्री रमणसिंह यांचे कौतुक करताना छत्तीसगढचे मंत्री अजय चंद्रकार यांची जीभेवरील ताबा सुटला. रमणसिंह यांना इच्छामरणाचे वरदान प्राप्त आहे. भीष्माप्रमाणे कधी जिंकायचे आणि कधी हारायचे, हे त्यांना ठाऊक आहे. छत्तीसगढ समृद्ध होत नाही, तोपर्यंत रमणसिंह त्यांना हरवायचे कसे, हा भेद कोणालाही सांगणार नाहीत, असे अजय चंद्रकार यांनी सांगितले.