मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना भेटणार
एनपीआर बाबत चर्चा होण्याची शक्यता
नवी दिल्ली : मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटणार आहेत. राजकीय वर्तुळाचं लक्ष या बैठकीकडे लागून राहिलं आहे. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यातल्या भेटीत वादग्रस्त राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी म्हणजेच एनपीआर बाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. एनपीआरची अंमलबजावणी देशहिताची असल्याचं सांगत, राज्यात एक मे पासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मात्र त्याच्या ठाम विरोधात आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात एनपीआर लागू करण्याचा निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन, या भेटीत सोनिया गांधींकडून उद्धव ठाकरेंना केलं जाण्याची शक्यता आहे. विविध राज्यांतल्या भाजपेतर सरकारांनी एनपीआर बाबत घेतलेली विरोधाची भूमिका, महाराष्ट्रातही महाविकास आघाडीनंही घ्यावी अशी काँग्रेस तसंच राष्ट्रवादीचीही उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा आहे.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची मोदींशी ही दुसरी भेट आहे. याआधी पुण्यात पंतप्रधान आले असताना दोघांची विमानतळावर भेट झाली होती. पण ती फक्त काही मिनिटांपुरतीच होती. आता दोघांची सविस्तर भेट होणार आहे. यावेळी राज्याला मिळणाऱा निधी आणि महापूरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या मदतीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.