वंदे भारतच्या फूड पॅकेटमध्ये सापडलं झुरळ; फोटो व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली अशी प्रतिक्रिया
वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणात झुरळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रवाशाने याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
Vande Bharat Exp : वंदे भारत ही सध्या देशातील लोकप्रिय ट्रेन आहे. देशभरात अनेक मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. जलद प्रवास आणि ट्रेन मध्ये मिळणाऱ्या खास सुविधा यामुळे हजारो प्रवासी वंदे भारत ट्रेनने प्रवास करत आहेत. याच वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणात या प्रवाशाला मेलेलं झुरळ सापडले आहे. प्रवाशाने या फूड पॅकेटचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यानंतर IRTC ने या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.
1 फेब्रुवारी रोजी वंदे भारत एक्स्प्रेसच्या राणी कमलापती ते जबलपूर जंक्शन दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशाला हा विचित्र अनुभव आला आहे. वंदे भारतच्या फूड पॅकेटमध्ये या प्रवाशाला झुरळ सापडले आहे. प्रवाशाने सोशल मिडियावर या प्रकाराचे फोटो शेअर केले आहेत. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
डॉ. शुभेंदू केशरी नावाच्या प्रवाशाने @iamdrkeshari या आपल्या X हँडलवरुन झुरळ सापडलेल्या फूड पॅकेटचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोसह नेमकं काय घडलं याची माहिती देखील डॉ. शुभेंदू केशरी यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.
डॉ. शुभेंदू केशरी यांच्यासह नेमकं काय घडलं?
मी 1 फेब्रुवारी रोजी RKMP ते JBP (वंदे भारत एक्सप्रेस) ट्रेन क्रमांक 20173 ने प्रवास करत होतो. प्रवासादरम्यान मी IRTC च्या माध्यमातून नॉनव्हेज थाळी ऑर्डर केली होती. फूड पॅकेट मधील जेवणाचे एक दोन घास खाल्ल्यानंतर मला धक्का बसला. या फूड पॅकेटमध्ये मला मेलेले झुरळ आढळले असं डॉ. शुभेंदू केशरी यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे.
फोटो सोशल मिडियावर व्हायरल
डॉ. शुभेंदू केशरी यांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये फूड पॅकेटमध्ये झुरळ स्पष्ट दिसत आहे. फोटो शेअर करताना डॉ. शुभेंदू केशरी यांनी IRTC ला देखील टॅग केले होते. IRTC ने तात्काळ डॉ. शुभेंदू केशरी यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांना रिप्लाय दिला आहे. फूड सर्व्हिस देणाऱ्या कंत्राट दारावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती IRTC ने रिप्लाय मध्ये दिली आहे.