मुंबई : सध्या देशभरात थंडीची लाट पाहायला मिळत असतानाच महाराष्ट्रातही पारा चांगलाच खाली गेला आहे. यंदाच्या वर्षी हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद धुळ्यात करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी १५ ते २० अंशांवर असणारं येथील तापमान आता थेट ६.० अंश सेल्शिअसवर पोहोचलं आहे. त्यामुळे गरम, लोकरी कपड्यांशिवाय येथील नागरिकांना घराबाहेरही पडणं अशक्य झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात विविध ठिकाणी बोचऱ्या थंडीला सुरुवात झालेली असतानाच तिथे उत्तर भारतही थंडीने पुरता गारठला आहे. जम्मू काश्मीरमध्ये पारा शून्याच्याही खाली उतरला आहे. श्रीनगरमध्ये सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं. तर पर्यटकांसाठी  आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारं दल लेकही अक्षरशः गोठून गेलं आहे. 


तिथे काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश येथे हिमवृष्टी सुरु असतानाच राजधानी दिल्लीत विक्रमी थंडीची नोंद झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार शनिवारी पहाटे  दिल्लीचा पारा ३.६ अंशावर गेला होता. तापमान याहूनही खाली गेल्यामुळे दिल्लीतील दृश्यतामानही अत्यंत कमी नोंदवलं गेलं. पालम भागात शून्य दृश्यतामानाची नोंद झाली, तर सफरदजंग भागात ८०० मीटर दृश्यतामानाची नोंद झाली.




वाचा : न्याय मागणाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्या; 'सामना'तून भाजपवर निशाणा


यंदाच्या वर्षी राजस्थानमध्येही थंडीची लाट पसरली आहे. येथील तापमान ३ डिग्री अंशांवर गेलंय. या थंडीच्या लाटेने सर्वत्र धुक्याची लाट निर्माण झाली आहे. परिणामी फतेहपूर भागामध्ये याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. ज्यामुळे ठिकठिकाणी लोकं शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत.  फक्त मानवी जीवनच नाही, तर पिकांवरही थंडीचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिकांवर बर्फाचा थर आल्याने पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्येही देशभरात थंडीची ही लाट कायम राहण्याची चिन्हं आहेत.