नवी दिल्ली: दिल्लीसह उत्तर भारतात सध्या कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. १९०१ नंतर दिल्लीतील सर्वाधिक थंडी असलेला दुसरा डिसेंबर महिना म्हणून यंदाच्या डिसेंबरची नोंद झाली आहे. १९०१ नंतर १९१९, १९२९, १९६१, १९९७ या वर्षातील डिसेंबर महिन्यात दिल्लीतील सरासरी कमाल तापमान २० अंशाच्या आसपास नोंदवण्यात आले होते. १९९७ मध्ये तापमानाचा पारा १७.३ अंशापर्यंत खाली घसरला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, यंदाच्या डिसेंबर महिन्यात कमाल सरासरी तापमान १९ अंशांपेक्षाही खाली घसरले आहे. ३० डिसेंबरला कमाल सरासरी तापमान १८.७६ अंश इतके नोंदवण्यात आले. उद्या म्हणजे ३१ डिसेंबरला तापमान अगदी ३० अंशावर जाऊन पोहोचले तरी इतिहासात यंदाच्या डिसेंबर महिन्याची नोंद १९०१ नंतरचा दुसरा सर्वाधिक कमी तापमान असलेला डिसेंबर अशीच राहील. 


भारतीय हवामान विभागाने ३० डिसेंबर हा १९०१ नंतरचा डिसेंबर महिन्यातील सर्वाधिक थंड दिवस असल्याची माहिती दिली. काल दिल्लीचे कमाल तापमान ९.४ अंश सेल्सिअस इतके राहिले. यापूर्वी २८ डिसेंबर १९९७ रोजी तापमानाचा पाऱ्यात अशीच लक्षणीय घट झाली होती. त्यावेळी दिल्ली शहराचे किमान तापमान ११.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते. 


हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतात दरवर्षी डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध आणि जानेवारीच्या पूर्वार्धात कधी ना कधी तापमानाचा पारा २ ते ४ अंशापर्यंत खाली घसरतो. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात डिसेंबर महिन्यात तापमान कधीही १६ ते १८ अंशांच्या वर जात नाही. तर दिल्ली, उत्तर राजस्थानमध्ये डिसेंबर महिन्यात कमाल तापमान २० ते २२ अंशांपेक्षा वर जात नाही. मात्र, यंदाच्या हिवाळ्यात यापैकी बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान हे १० अंशांच्या खालीच राहिले आहे.