कोरोना व्हायरस संबंधित दिल्लीतून दिलासादायक बातमी
चीनपासून सुरु झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात होत आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. अशात राजधानी दिल्लीतून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. चीनच्या वुहान शहरातून भारतात आलेल्या ११२ नागरिकांचे कोरोना व्हायरसचे टेस्ट नेगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे, असं म्हणायला हरकत नाही.
चीनमधून आलेल्या ११२ नागरिकांमध्ये ३६ परदेशी नागरिकांचा देखील समावेश होता. चीनमधून भारतात दाखल झाल्यानंतर त्यांना आयटीबीपी छावाला कँम्पमध्ये ठेवण्यात आले होते. आवश्यक क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर या ११२ जणांची कोरोना व्हायरस टेस्ट नेगेटीव्ह आली आहे.
महत्त्वाचं म्हणजे आता हे नागरिक छावाला कँम्पमधून बाहेर पडत आहेत. दरम्यान देशात १३ नवे कोरोना व्हायरस (Coronavirus ) बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत या विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ७३ वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
चीनपासून सुरु झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात होत आहे. भारतात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर दिल्ली सरकराने महत्वाचा निर्णय घेतलाय. दिल्लीतील सर्व सिनेमागृह आणि शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. या दरम्यान शाळा आणि कॉलेजमध्ये कोणत्याही परीक्षा होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.