बंगळुरुत लोक फ्लायओव्हरवर गाड्या बेवारस सोडून निघून गेले, नेमकं असं काय झालं? अनेक VIDEO व्हायरल
वाहतूक कोंडी हा बंगळुरुमधील (Bangalore) नागरिकांसाठी आता नेहमीची डोकेदुखी झाली आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे इलेक्ट्रॉनिक सिटी फ्लायओव्हरवर जवळपास तीन तास गाड्या अडकून पडल्या होत्या. वाहतूक कोंडीच अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.
बंगळुरुमधील (Bangalore) वाहतूक कोंडी नागरिकांसाठी नित्याची डोकेदुखी झाली आहे. त्यात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे बंगळुरुत प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने इलेक्ट्रॉनिक सिटी फ्लायओव्हरवर (Electronic City Fflyover) वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जवळपास तीन तास हजारो नागरिक आपल्या गाड्यांमध्ये अडकून पडले होते. अखेर आपल्या गाड्या फ्लायओव्हरवर सोडून निघून जाण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये लोक आपल्या गाड्या सोडून निघून जाताना दिसत आहेत.
रूपेना अग्रहारा येथे पूर आल्याने तामिळनाडू ते बंगळुरू शहराच्या मध्यभागी असलेल्या टेक कॉरिडॉरला जोडणाऱ्या मार्गावर ग्रीडलॉक झाला. रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने बंगळुरू वाहतूक पोलिसांनी पुढील गर्दी टाळण्यासाठी उड्डाणपुलाची एक बाजू बंद केली.
रस्त्यांवर पाणी साचल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली होती. येलहंका येथील केंद्रीय विहार अपार्टमेंटसह काही भागांमध्ये पाणी साचलं. सकाळी हे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी परिस्थिती बिकट आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रवाशांनी आपलं गाऱ्हाणं मांडलं. कंपन्यांकडून घरून काम करण्याच्या सल्ल्याचे पालन का केलं जात नाही? अशी विचारणा अनेक युजर्सनी केली आहे. कर्नाटक सरकारने यापूर्वीच खासगी कंपन्यांना 23 ऑक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याचा सल्ला दिला होता.
एका एक्स युजरने इलेक्ट्रॉनिक सिटी फ्लायओव्हरवर जवळपास दीड तास अडकल्याची माहिती दिली. आम्ही आतापर्यंत 30 किमी दूर घरी पोहोचणं अपेक्षित होतं असंही त्याने सांगितलं, संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी लॉग आउट करूनही, ते अजूनही अडकले होते, आणि बरेच कर्मचारी इतका वेळ अडकावं लागल्याने चालत निघून गेले अशी माहिती त्याने दिली.
दुसऱ्या एका युजरने इतरांना इलेक्ट्रॉनिक सिटीमधून प्रवास टाळण्याचा इशारा दिला. कारण त्यांना दुचाकीवर देखील नेहमीपेक्षा चारपट जास्त वेळ लागला. नेहमीची संकटं सातत्याने येत असताना मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आव्हानांमध्ये शहर आपल्या वाहतूक समस्यांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करू शकेल का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.