`यार मला तुझ्याशी...,` उबर चालकाचा तरुणीला मेसेज; स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर कंपनी म्हणते, `आम्ही तर...`
उबर चालकाने आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत पाठवलेल्या आक्षेपार्ह मेसेजचा स्क्रीनशॉट एका तरुणीने एक्सवर शेअर केला आहे. यानंतर कंपनीने तिच्या पोस्टला उत्तर दिलं आहे. मात्र या घटनेनंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
टॅक्सी चालकांची मुजोरी, जवळच्या भाड्याला नकार यामुळे सध्या अनेकजण ऑनलाइन कॅब सर्व्हिसला पंसती देतात. पण येथेही काही तरुणींना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागतं. याआधी अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तरुणीन पोस्ट शेअर करत वाच्यता केल्यानेच ही घटना उघड झाली आहे. उबर चालकाने तरुणीला मेसेज करुन, माझ्याशी मैत्री करशील का? अशी विचारणा केली. तरुणीच्या पोस्टवर उबर कंपनीनेही उत्तर दिलं आहे. दरम्यान या घटनेनंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
तरुणीने पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
तरुणीने पोस्ट शेअर करताना चालकाने पाठवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये तो मी तुम्हाला ड्रॉप केलं होतं, आठवतंय का? असं सांगत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. यावर तरुणी तू मला का मेसेज करत आहेस? अशी विचारणा करते. त्यावर यार मला तुझ्याशी मैत्री करायची आहे असं सांगतो. स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे त्यानुसार, भोलेशंकर असं या चालकाचं नाव आहे.
तरुणीने हे स्क्रीनशॉट शेअर करत एक्सवरुन उबरला टॅग करत तक्रार केली आहे. त्यात तिने लिहिलं आहे की, "तुमच्या एका चालकाबाबत आलेला गंभीर अनुभव शेअर करण्यासाठी मी हे लिहित आहे. 19 ऑक्टोबरला तुमच्या एका चालकाने प्रवासानंतर मला अस्वस्थ करणारा संदेश पाठवला. यामुळे मला फक्त अस्वस्थच वाटत नाही आहे, तर सुरक्षेची गंभीर चिंता सतावत आहे".
"मला वाटतं उबर एक असं व्यासपीठ असावं जिथे त्यांच्या ग्राहकांचा आणि खासकरुन महिलांचा चालकावर आणि संपूर्ण अनुभवावर विश्वास असावा. या घटनेने माझा विश्वास मोडला आहे. तसंच उबरवर अवलंबून राहणार्या सर्व महिला प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता वाटत आहे," असं तरुणीने लिहिलं आहे.
पुढे तिने म्हटलं आहे की, "सहभागी चालकाची ओळख पटवत या घटनेचा तपास करावा तसंच पुन्हा भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. उबर प्रवाशांची सुरक्षा ही प्राथमिकता असावी. तुम्ही ही तक्रार गांभीर्याने घेत आहात अशी आशा आहे. तुम्ही याप्रकरणी तात्काळ उत्तर देत, यावर तोडगा काढाल अशी अपेक्षा".
उबरने दिलं उत्तर -
तरुणीच्या या पोस्टवर उबरनेही उत्तर दिलं आहे. ही स्थिती किती अस्वस्थ कऱणारी आहे याची आपल्याला कल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं असून, आपली टीम तपास करत असल्याची माहिती दिली आहे. "आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आभार. ही परिस्थिती किती अस्वस्थ कऱणारी आहे हे समजू शकतो. आमची टीम तपास करत असून, लवकरच तुम्हाला अपडेट देऊ," असं कंपनीने म्हटलं आहे.
तरुणीची ही पोस्ट एक्सवर व्हायरल झाली असून, अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे. उबर काय कारवाई करणार याकडे आपलं लक्ष असल्याचंही अनेकांनी लिहिलं आहे.