Bihar Bridge Collapse : रविवारी संध्याकाळी बिहारच्या (Bihar News) भागलपूरमध्ये सुलतानगंज-अगुवानी गंगा नदीवरील (Ganga River) बांधकामाधीन चार पदरी पूल पुन्हा एकदा कोसळला आहे. बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा महत्त्वाचा भागच नदीत पडला. त्याचवेळी पुलावर कर्तव्यावर असणारे दोन गार्डही अपघातानंतर बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर देशभरात या पुलाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरु आहे. गेली अनेक वर्षे हा पूल बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्यापही तो पूर्ण झालेला नाही. एसपी सिंगला कंपनीतर्फे (SP Singla Constructions) हा पूल बांधण्यात येत आहे. दुसरीकडे या पुलाचे योग्य काम न झाल्याने तो पाडण्यात आला असे सरकारचे म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाची बाब म्हणजे ज्या कंपनीने हा पूल बांधला होता त्याच कंपनीला बिहारमधील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनी यापूर्वीही वादात सापडली आहे. पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प लोहिया पथ चक्राच्या बांधकामादरम्यान काँक्रीटचा स्लॅब कोसळून 2022 मध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला तेव्हा कंपनी पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. या घटनेची चौकशी झाली पण नंतर काय झाले ते कोणालाच कळले नाही.


आश्चर्यकारक बाब म्हणजे एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनी बिहारमध्ये 5 मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. हे प्रकल्प 30 किमीपेक्षा जास्त लांबीचे आहेत. यामध्ये पूल आणि उड्डाणपुलांचा समावेश आहे. त्यांची किंमतही हजारो कोटी रुपये आहे. या कंपनीतर्फे पाटण्यात जुन्या महात्मा गांधी पुलाच्या समांतर नवीन महात्मा गांधी पूल बांधला जात आहे. या प्रकल्पाची किंमत 3000 कोटी रुपये आहे. तर जेपी पूल, मोकामामध्ये गंगा नदीवरही एसपी सिंगला तर्फे पूल बांधण्यात येत आहे. याचा अनुक्रमे खर्च हा  3000 कोटी आणि 1200 कोटी इतका आहे.


मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले?


1750 कोटी पाण्यात गेल्यानंतर बिहारमधल्या विरोधकांनी नितीश कुमार यांच्या सरकारवर निशाणा साधला होता. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "2012 मध्ये पूल बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2014 मध्ये तो पूल बनवायला सुरुवात झाली. वर्षभरापूर्वीही आम्ही म्हटले होते की हा पूल पुन्हा पडेल. संबधित विभागातील अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले होते. ही कामाची पद्धत नाही. बांधकाम आत्तापर्यंत व्हायला हवे. इतका वेळ का लागतोय?," असे नितीश कुमार म्हणाले.


दरम्यान, गेल्या वर्षीही अपघातग्रस्त पुलाचे सुपर स्ट्रक्चर नदीत पडले होते. जोरदार वादळ आणि पावसात सुमारे 100 फूट लांबीचा भाग नदीत कोसळला होता. मात्र, त्यावेळी कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. त्यानंतर पुन्हा पूल बांधणीचे काम सुरू झाले. यावेळी सुपर स्ट्रक्चरचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र पुन्हा एकदा तो खाली पडला.