नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या मोदी सरकारला काश्मीरमधील लोकसंख्येचा (demography) चेहरामोहराच बदलायचा आहे, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला. त्यांनी रविवारी ट्विटरच्या माध्यमातून काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ट्विटमध्ये इम्रान खान यांनी म्हटले आहे की, वांशिक नरसंहार करून काश्मीरमधील लोकसंख्येचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता प्रश्न हाच आहे की, हिटरलने म्युनिचमध्ये जे काही केले होते, तशीच गोष्ट घडताना हे जग आनंदाने पाहणार का?, असे इम्रान यांनी म्हटले आहे. 


तसेच मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यानुसार चालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी इम्रान यांनी संघाची तुलना नाझींशी केली. हिंदू श्रेष्ठत्वावर आधारलेल्या संघाच्या विचारसरणीची मला भीती वाटते. हे कधीच थांबणार नाही. याउलट भविष्यात भारतामध्ये मुस्लिमांचे दमन होईल आणि हळूहळू हे पाकिस्तानला लक्ष्य करण्यापर्यंत पोहोचेल. हिंदू वर्चस्ववाद हा हिटलरच्या नाझी वर्चस्वादाप्रमाणेच आहे, असेही इम्रान यांनी म्हटले आहे. 



त्यामुळे काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. पाकिस्तान अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडे दाद मागण्याच्या तयारीत आहे. यासाठी चीनचाही आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.