India China Clash : भारत आणि चीन सीमावाद (India China Border Issue) खूप जुना आहे. गेल्या काही वर्षात भारतीय सैन्यानं फक्त चीनची प्रत्येक चाल निकामी केलेली नाही तर चीनला प्रत्येक आघाडीवर चोख प्रत्युत्तर दिलंय.  9 डिसेंबरला तवांगमध्ये (Tawang) भारत आणि चीनचे जवळपास 300हून अधिक सैनिक भिडले. मात्र भारतीय सैनिकांनी (Indian Army) चिनी घुसखोरीचा डाव हाणून पाडला. भारतीय सैनिकांनी पराक्रमाने पीएलएचे मनसुबे उधळून लावले, असं निवेदन संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनचा तवांगवर डोळा
चीनचा तवांगवर अगदी 1949 पासूनच डोळा आहे. 1962 च्या भारत चीन युद्धात चीनने तवांग बळकावला होता. पण युद्धविराम झाल्यावर चीनने तवांग जिल्हा पुन्हा सोडून दिला. तवांग हा भारत - चीन - भुतान या सीमारेषेवरील महत्त्वाचा प्रदेश असल्याने तो ताब्यात असेल तर तिबेटभोवतीची (Tibet) तटबंदी भक्कम होते असा चीनचा कयास आहे. तसंच तवांग हे दक्षिण तिबेट असल्याचाही चीनचा दावा आहे. चिनी सैनिकांनी याआधीही वारंवार इथे घुसखोरीचे प्रयत्न केले तसंच चीनने अनेकदा तवांगसह संपूर्ण अरूणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) नकाशात चीनचा भागही दाखवला आहे. मात्र यावेळी झालेल्या घुसखोरीच्या प्रयत्नांना आणखी एक कारण आहे. 


भारतीय पोस्ट चीनसाठी डोकेदुखी
तवांगमधील होलीदीप आणि परिक्रमा या भारताच्या दोन पोस्टवर चीनला कब्जा करायचा आहे. 17 हजार फूट उंचीवर असलेल्या या भारतीय पोस्ट चीनसाठी डोकेदुखी झाल्या आहेत. इथून अगदी समोर चिनी हद्दीत असलेल्या चिनी लष्करी तळावर थेट नजर ठेवणं भारताला शक्य होतं. त्यामुळे या उंचीवरच्या पोस्ट आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी चिनी आटापिटा करत आहेत. 


घुसखोरीच्या काही दिवस आधीच चीनने भारतीय हद्दीत ड्रोन (Drone) पाठवण्याचे प्रयत्न केले. पण भारतीय वायुदलाने (Indian Air Force) सुखोई 30 विमानांच्या सहाय्याने चिनी ड्रोनला घुसखोरी करू दिली नव्हती. अखेर चीनने 300 हून अधिक सैनिक पाठवून पोस्ट बळकावण्याचा प्रयत्न केला खरा. पण यात चीनचीच मोठी हानी झालीय. आता यावर चीनने सीमा स्थिर असल्याची सारवासारव केलीय. भारत चीन सीमेवरील सद्यस्थिती स्थिर आहे. सीमावादावर राजनैतिक आणि लष्करी पातळीवर दोन्ही बाजूंची निरंतर चर्चा सुरू आहे असं स्पष्टीकरण चीनच्या परराष्ट्र खात्याने दिलंय. 


तवांगमध्ये मार खावून चिनी माघारी गेले असले तरी एक मात्र नक्की. कुरापतखोर चीन शांत बसणार नाही. गलवान संघर्षानंतर सलग 30 महिने भारताला पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करावं लागतंय. आता तशीच वेळ तवांगसारख्या अतिदुर्गम भागातही आली तर भारतासाठी ही मोठी डोकेदुखीच असेल. पण ड्रॅगनला कसं ठेचायचं हे भारताला चांगलंच ठाऊक आहे.