मोदींनी प्रचारासाठी भारतीय वायूदलाची विमाने स्वस्तात वापरली; काँग्रेसचा पलटवार
काही ठिकाणी विमानांसाठी आकारण्यात आलेले भाडे खूपच कमी होते.
नवी दिल्ली: राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना भारतीय नौदलाच्या INS विराटचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केला, असा आरोप करणाऱ्या मोदींना गुरुवारी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय वायूदलाच्या विमानांचा स्वस्तात वापर करून घेतला, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. यासाठी सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांच्या काही बातम्यांचाही दाखला दिला. सुरजेवाला यांनी म्हटले की, दिशाभूल आणि खोटेपणा हा तुमचा शेवटचा आधार आहे. तुम्ही भारतीय वायूदलाच्या विमानांचा वापर एखाद्या टॅक्सीप्रमाणे केलात. काही ठिकाणी तर एका विमानाच्या एका फेरीसाठी वायूदलाला अवघे ७४४ रुपये देण्यात आले. स्वत:च्या पापांची भीती आता तुम्हाला सतावत आहे. तरीही तुम्ही निर्ल्लजपणे दुसऱ्यांकडे बोट दाखवत असल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले.
यावेळी सुरजेवाला यांनी माहिती अधिकाराचा वापर करून दिलेल्या एका वृत्ताचा हवाला दिला. यामध्ये म्हटले आहे की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशांतर्गत प्रवासातील २४० अनौपचारिक फेऱ्यांसाठी भारतीय वायूदलाच्या विमानांचा वापर करण्यात आला. यासाठी भाजपने वायूदलाला १.४ कोटी इतकी रक्कम दिली. मात्र, काही ठिकाणी विमानांसाठी आकारण्यात आलेले भाडे खूपच कमी होते. १५ जानेवारी २०१९ रोजी 'एच/पी बालांगीर-एच/पी पाथरचेरा' प्रवासासाठी तर भाजपला अवघे ७४४ रुपये मोजावे लागले, याकडे सुरजेवाला यांनी लक्ष वेधले. त्यामुळे आता भाजप या आरोपाला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राजीव गांधी यांचा उल्लेख भ्रष्टाचारी नंबर १ असा केला होता. यावर आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. मात्र, त्यानंतरही मोदींनी राजीव गांधी यांच्यावर टीका करणे सुरुच ठेवले होते. दिल्लीत बुधवारी झालेल्या प्रचारसभेतही त्यांनी राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी भारतीय नौदलातील INS विराटचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केल्याचा खळबळजनक आरोप केला होता.