देशाला कोणी दुभंगू शकत नाही, आम्ही सरकारसोबतच - राहुल गांधी
ही वेळ एकत्र येऊन परिस्थितीला तोंड देण्याची
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये जम्मू- काश्मीरच्या पुलवामा येथे असणाऱ्या अवंतीपोरा येथील आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याची निंदा केली आहे. या हल्ल्याचा निषेध करत ही वेळ सर्वांनीच एकत्र येऊन दहशतवादाशी लढा देण्याची आणि शहिदांच्या कुटुंबीयांचा आधार बनण्याची असल्याचं स्पष्ट केलं. हा भ्याड हल्ला म्हणजे देशाच्या आत्म्यावरच घातलेला घाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. सोबतच या अशा हल्लांच्या मदतीने आणि दहशतवादी कारवायांने देशाला दुभंगता येणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
गुरुवारी झालेल्या या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी यावेळी आपण सरकारच्याही प्रत्येक भूमिकेत त्यांच्या सोबत असल्याचं स्पष्क केलं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याला दुजोरा देत ही वेळ राजकीय धोरणं किंवा भूमिकांविषयी बोलण्याची नसून एकत्र येत दहशतवादाशी लढा देण्याची असल्याचीच बाब अधोरेखित केली. दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं म्हणत सिंग यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत विरोध केला. सोबतच देशाच्या संरक्षणार्थ घेण्यात येणाऱ्या निर्णयांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.
राजकारणाच्या वाटा आणि चर्चा तूर्तास बाजूला सारत सध्या सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्यास सुरुवात करत या हल्ल्याचा निषेध केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचं सडेतोड उत्तर देणार असल्याचा इशारा शेजारी राष्ट्राला दिल्यामुळे आता त्यांची पुढील भूमिका काय असणार याकडेच साऱ्या देशाचं आणि जगाचंही लक्ष लागलं आहे.