राहुल गांधींच्या बसमध्ये महाआघाडी, हा फोटो भाजपला विचलीत करु शकतो !
2019 निवडणूकीत भाजपचा पराभव करण्यासाठी महाआघाडीही सज्ज झाली आहे.
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राज्यस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणूकीत विजय मिळाल्यानंतर कॉंग्रेसच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस जिंकल्यानंतर आज राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नवे सरकार स्थापन होत आहे. या तीन राज्यांमध्ये नवे मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ घेतली जात आहे. या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे महाआघाडी सोबत हजेरी लावत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी सकाळी शपथ घेतली. यानंतर दुपारी मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देखील राहुल गांधी आणि संपूर्ण महाआघाडीच्या उपस्थितीत शपथ घेतली. तर आता थोड्याच वेळात छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे देखील मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
महाआघाडी सज्ज
छत्तीसगडच्या शपथविधी सोहळ्यासाठी महाआघाडी छत्तीसगडच्या दिशेने रवाना झाली आहे. 2019 निवडणूकीत भाजपचा पराभव करण्यासाठी महाआघाडीही सज्ज झाली आहे. सोमवारी तीन राज्यांमध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाआघाडीतील नेत्यांसोबत दिसले. 2019 मध्ये कॉंग्रेस याच विरोधी पक्षांना एकत्र घेऊन भाजपाला हरवण्याच्या रणनीतीवर काम करत आहे.
राहुल गांधींचं ट्वीट
राहुल गांधी यांनी राज्यस्थानहून निघताना एक ट्वीट करत कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचं त्यांनी अभिनंदन केलंय. यामध्ये ते विरोधी पक्षांच्या नेत्यांना घेऊन प्रवास करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या ट्वीटला सोशल मीडियात खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. राहुल गांधीवर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. विरोधी पक्षांसोबत राहुल गांधींना फोटोमध्ये पाहणं भाजपला विचलीत करु शकत असंही युजर्स म्हणत आहेत.
विरोधकांचं शक्ती प्रदर्शन
ही महाआघाडी बनण्यासाठी गेले वर्षभर प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षांना एकत्र आणून राहुल गांधी तीन राज्यांचा दोरा करत आहेत. शपथविधी सोहळ्यात राहुल गांधी विरोधकांना एकत्र आणत पंतप्रधान मोदींना आपल्या ताकदीची जाणीव करुन देत आहेत असंही यानिमित्ताने म्हटले जात आहे.