नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या बाबतीत संबंधित यंत्रणांकडून अक्षम्य चूक घडल्याचा प्रकार समोर आला आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघात बुधवारी राहुल गांधी यांचा रोड शो झाला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर लेझर लाईट मारण्यात आल्याचे समोर आले आहे. काँग्रेस पक्षाने याची गंभीर दखल घेत पत्र पाठवून हा प्रकार केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवला आहे. या पत्रावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला यांची स्वाक्षरी होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा सुरु झाली होती. राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर मारण्यात आलेली लेझर स्नायपर रायफलची असण्याची शक्यता होती. जवळपास सातवेळा राहुल यांच्या डोक्यावर हिरव्या रंगाची लेझर लाईट दिसून आली. ही सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटी असल्याचे या पत्रात म्हटले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे सर्व आक्षेप फेटाळून लावण्यात आले आहेत. राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावरील लेझर लाईटचा प्रकाश हा काँग्रेस कार्यकर्त्याच्या मोबाईलमधून येत होता, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच काँग्रेसकडून आपल्याला कोणतेही पत्र आले नसल्याचा दावाही गृहमंत्रालयाने केला. 


राहुल गांधी यांच्या सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या एसपीजीकडूनही यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या (एआयसीसी) छायाचित्रकाराकडून व्हीडिओ चित्रण सुरु होते. त्याच्या मोबाईलमधून बाहेर पडत असलेल्या हिरव्या रंगाच्या लाईटचा प्रकाश राहुल यांच्या चेहऱ्यावर पडला होता, असे एसपीजीच्या संचालकांनी सांगितले. मात्र, काँग्रेसने या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी लावून धरली आहे.