प्रियंका गांधी पंतप्रधान मोदींविरूद्ध लढणार ? झालं स्पष्ट
या जागेवर प्रियंका गांधी वाड्रा या उभ्या राहणार असल्याची चर्चा होती.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेस पार्टीने वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उमेदवाराची घोषणा केली आहे. या जागेवर प्रियंका गांधी वाड्रा या उभ्या राहणार असल्याची चर्चा होती. पण काँग्रेस पार्टीने या जागेवर अजय राय यांचे नाव पुढे केले आहे. अजय राय याआधीही या जागेवरून काँग्रेसचे उमेदवार राहीले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते तिसऱ्या स्थानी होते. तर 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही ते तिसऱ्या स्थानीच होते.
या जागेवरून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असे वृत्त माध्यमांतून येत होते. पार्टी मला ज्या जागेवर उभे राहण्यास सांगेल तिथून निवडणूक लढवेन असे प्रियंका यांनी सांगितले होते. यावेळेस त्यांनी वाराणसीतून निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर केली होती. आज काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. काँग्रेसने गोरखपूर येथून मधुसूदन तिवारी यांना तिकीट दिले आहे.