वाराणासी : loksabha election 2019 चार दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असणाऱ्या प्रियंका गांधी या राजकीय पटलावर सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर सक्रिय राजकारणात उडी घेत जनतेशी जास्तीत जास्त संपर्क साधत त्या काँग्रेसच्या प्रचारासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे त्यांचा सध्या सुरु असणारा उत्तर प्रदेश दौरा. या दौऱ्यादरम्यान प्रियंका २० मार्च या दिवशी वाराणासीमध्ये असणं अपेक्षित असून, रुपरेषेनुसार त्या काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शनही घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण, आता मात्र त्यांची ही वाराणासी भेट वादाचा विषय ठरत आहे. वाराणासीतील काही वकिलांनी प्रियंका यांच्या मंदिर भेटीला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित प्रियंका गांधी वाड्रा यांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी न देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वाराणासीमध्ये असणारं हे मंदिर हिंदू धर्मियांचं असून, त्यात प्रियंका या ख्रिस्तधर्मीय असल्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख असणाऱ्या या पत्रात प्रियंकांसाठी पूजा करण्याची योग्य जागा ही चर्च असल्याचं म्हणण्यात आलं आहे. 


सोमवारी प्रियंकांनी त्यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याची सुरुवात केली. उत्तर प्रदेशातील राजकारणाची परिस्थिती बदलण्याची जबाबदारी माझी असल्याचा विश्वास त्यांनी जनतेला देऊ केला. सोबतच आगामी लोकसभा निवडणुका या मतदारांसाठी एक आव्हानच असणार आहे, असंही त्या म्हणाल्या. घृणा आणि खोटेपणातं राजकारण तुम्हाला हवं आहे, की विकासाचा राजकारण असा प्रश्न त्यांनी मतदारांपुढे ठेवला. मतदार हे विचारपूर्वकपणेच मतदान करणार असून, काँग्रेसला निवडून देत देशाला एक पाऊल पुढे नेतील, असा विश्वास प्रियंका यांनी व्यक्त केला. त्यांचा हा विश्वास आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचं तंत्र पक्षासाठी कितपत फायद्याचं ठरणार आहे, हे येत्या निवडणुकांच्या निकालांतूनच स्पष्ट होणार आहे.