अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च कार्यकारिणीची आज अहमदाबादमध्ये बैठक होणार आहे. पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर प्रियंका गांधी - वाड्रा यांच्या उपस्थितीत होणारी ही पहिलीच कार्यकारिणीची बैठक आहे. गुजरातमध्ये तब्बल ५८ वर्षांनी कार्यकारिणीची बैठक होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं गुजरातमधल्या सर्वच्या सर्व २६ जागा जिंकल्या होत्या. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं चांगलीच लढत दिली. त्यामुळे भाजपला तिहेरी आकडा गाठणं शक्य झालं नव्हतं. त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयानं गुजरातमध्ये काँग्रेसचा उत्साह आणखीन वाढलाय. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत.


हार्दिक पटेल

काँग्रेसमध्ये 'हार्दिक' प्रवेश


काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर होणाऱ्या जाहीर सभेत पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. हार्दिक पटेल यांनी पाटीदार आरक्षण आंदोलन समितीसह एक बैठक घेतली. त्यात काँग्रेसमध्ये जाण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. 


सूत्रांच्या माहितीनुसार हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक जामनगरमधून उभं राहू शकतात. आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी जामनगर लोकसभा क्षेत्रात कामाला लागण्याचे आदेशही दिल्याचं समजतंय. हार्दिक पटेल हे अधिकृतपणे काँग्रेसमध्ये सहभागी होत असल्याने त्याचा पक्षाला राजकीय लाभ होऊ शकतो.