आम्हाला जिंकणे शक्य नसेल तर किमान भाजपच्या उमेदवारांना तरी पाडू- प्रियंका गांधी
कोणताही राजकीय पक्ष फक्त जिंकण्यासाठी राजकारण करत नाही.
रायबरेली: काँग्रेसने उत्तर प्रदेशातील काही जागांवर जिंकण्याच्या नव्हे तर केवळ भाजपला पाडण्याच्यादृष्टीने उमेदवार उभे केल्याचे वक्तव्य काँग्रेसच्या सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी केले. त्यांनी बुधवारी रायबरेली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रियकांना उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या विजयाची शक्यता कमी असल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा प्रियंका यांनी म्हटले की, माझी रणनीती अगदी स्पष्ट आहे. ज्याठिकाणी काँग्रेसची ताकद आहे तिथे आमचे उमेदवार विजयी होतील. मात्र, आमचे उमेदवार प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत कमी ताकदवान असतील त्याठिकाणी ते जिंकण्यासाठी नव्हे तर भाजपची मते कापण्यासाठी लढतील. कोणताही राजकीय पक्ष फक्त जिंकण्यासाठी राजकारण करत नाही, असे प्रियंका यांनी म्हटले. तसेच आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसेल. भाजपचा दारुण पराभव होईल, असेही प्रियकांनी सांगितले.
प्रियंका गांधी या बुधवारी सोनिया गांधी यांच्या प्रचारासाठी रायबरेलीमध्ये आल्या होत्या. तेव्हा पत्रकारांनी त्यांच्यासमोर काँग्रेसमुळे उत्तर प्रदेशात सपा-बसपा यांचेही नुकसान होईल, अशी शंका उपस्थित केली. मात्र, प्रियकांनी हा दावा फेटाळून लावला. हे कदापि घडणार नाही. काँग्रेस केवळ भाजपची मते कापेल. काँग्रेस पक्ष केवळ पंतप्रधानपदाच्या अपेक्षेने निवडणूक लढवत नाही. सामान्य जनतेच्या भल्यासाठी काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे, असेही प्रियंका यांनी सांगितले.
रायबरेली मतदारसंघात येत्या ६ मे रोजी मतदान होईल. यानंतर २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. त्यामुळे यंदा प्रियंका गांधी यांचा वैयक्तिक करिष्मा काँग्रेस पक्षासाठी फायदेशीर ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.