ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये गेल्याने उलट काँग्रेसचा फायदाच झाला- दिग्विजय सिंह
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडल्यानंतर ग्वाल्हेर आणि चंबळ भागात काँग्रेस पक्ष संपेल, असे म्हटले जायचे.
भोपाळ: ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसला तोटा होण्याऐवजी उलट मध्यप्रदेशात पक्ष पुनरुज्जीवित झाला, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले. ते रविवारी ग्वाल्हेरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, काँग्रेस पक्षाने ज्योतिरादित्य सिंधिया यांना सर्वकाही दिले. ते राहुल, प्रियांका आणि सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. ते काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्यही होते. एवढे मिळूनही ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले.
'गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष काँग्रेसची गेलेली पत पुन्हा मिळवून देऊ शकत नाही'
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडल्यानंतर ग्वाल्हेर आणि चंबळ भागात काँग्रेस पक्ष संपेल, असे म्हटले जायचे. मात्र, उलट ते काँग्रेस सोडून गेल्यामुळे या भागातील काँग्रेस पुनरुज्जीवित झाली आहे, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले. त्यामुळे आता ज्योतिरादित्य सिंधिया यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आगामी काळात मध्य प्रदेशमध्ये २७ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याच पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी ग्वाल्हेरमधील अनेक काँग्रेस नेत्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसेल, असा अंदाज सध्या राजकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे.