Lockdown 3.0 नंतर पुढे काय, सोनिया गांधींचा सवाल
परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे....
नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हायरसची दहशत गेल्या काही दिवसांपासून अधिकाधिकाधिक बळावत असतानाच राज्य आणि केंद्र शासनांकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. पहिल्या दोन टप्प्यांतील लॉकडाऊननंतरही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे काही दिवसांपूर्वीच Lockdown लॉ़कडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली. काही अंशी हे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथिलही करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पण, याच मुद्द्यावर आता विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असा वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे.
बुधवारी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेतली. या बैठकीला त्यांच्याव्यतिरिक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतरही काही नेते उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.
सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत ल़ॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर पुढे काय असा थेट प्रश्न उपस्थित केला. १७ मे या दिवशी लॉकडाऊनचा तिसरा टप्पाही पूर्ण होत आहे. त्यानंतर सरकारची काय रणनिती आहे, अशी विचारणा त्यांनी केली.
कोरोनाचा झपाट्याने वाढणारा संसर्ग पाहता, सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ आणि पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनाशी सुरु असणाऱ्या लढ्याबाबत आणि त्याच्यावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेतला. या बैठकीत स्थलांतरित आणि सध्याच्या घडीला देशाच्या विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकल्याचं म्हटलं जात आहे.
वाचा : मुंबई, पुण्यातून गावी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
दरम्यान, स्थलांतरित मजुरांना श्रमिक रेल्वे सुविधेअंतर्गत आपआपल्या राज्यांत पोहोचवलं जात असतानाच त्यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या तिकीट शुल्काचा मुद्दा राजकीय पटलावर बऱ्याच वादांना तोंड फोडत असताना काँग्रेसकडून अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली होती. स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार असल्याचं त्यांनी नुकतंच जाहीर केलं होतं.