नवी दिल्ली - काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या जाहीर सभेत काही जणांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचे समोर आल्यानंतर काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. यावर कोणतीच प्रतिक्रिया न देता पक्षाने थेट 'झी न्यूज'वरच चुकीचा व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप केला. या संदर्भात 'डीएनए' वृत्तपत्राने 'झी न्यूज'चे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांची खास मुलाखत घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या गेल्याचा चुकीचा व्हिडिओ 'झी न्यूज'ने प्रसारित केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हा आरोप बरोबर आहे का?
संबंधित व्हिडिओ चुकीचा असल्याचा काँग्रेसने केलेला आरोप पूर्णपणे निराधार आहे. मी स्पष्ट शब्दांत तो फेटाळून लावतो. घटनास्थळी त्यावेळी रेकाँर्डिंग करण्यात आलेले इतरही फुटेज आमच्याकडे आहे. त्यामध्येही तिथे तशा घोषणा दिल्या गेल्याचे ऐकायला मिळते आहे. काँग्रेसचा कोणताही नेता रंगेहाथ पकडला गेला की तो पक्ष संबंधित नेत्याच्या बचावासाठी तो व्हिडिओच खोटा असल्याचा दावा करतो. काँग्रेसमध्ये ही आता फॅशनच झाली आहे. परिस्थितीतून हात झटकण्यासाठी काँग्रेसकडून कायम असे केले जाते. 


व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी 'नानी याद दिला देंगे' असे म्हटले होते. यावर काय प्रतिक्रिया आहे?
नवज्योत सिंग सिद्धू यांनी वापरलेली भाषा आक्षेपार्ह आहे. लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो, असे काँग्रेस कायम म्हणते. काँग्रेस देशातील जुना पक्ष आहे. पण याच पक्षातील एक ज्येष्ठ नेते ज्यावेळी अशी उद्धटपणाची भाषा वापरतात, त्यातून हे स्पष्ट होते की काँग्रेसला माध्यमांचा आवाज दाबायचा आहे. काँग्रेसची री ओढली नाही म्हणूनच हे सगळे केले जात आहे. यातून काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचा उद्दामपणाच दिसून येतो.


'एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया'नेही यावर कोणतेच मत व्यक्त केले नाही. तुमची पुढील भूमिका काय असेल?
भारतातील लोकशाही व्यवस्थेवर 'झी न्यूज'चा पूर्ण विश्वास आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेवरही आमचा विश्वास आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून जे काही करणे शक्य आहे, ते सर्व आम्ही करू. 'न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन'कडे आम्ही लेखी तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाकडेही आम्ही लेखी तक्रार नोंदविली आहे. जर गरज वाटली, तर आम्ही न्यायालयातही जाऊ. काँग्रेसने या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेविरोधात आम्ही निषेध नोंदविला आहे. 'एडिटर्स गिल्ड'ने या संदर्भात कोणतीच भूमिका न घेतल्यामुळे आम्ही नाराज आहोत. पण माध्यमात कार्यरत असलेले बहुसंख्य आमच्या भूमिकेला पाठिंबा देतील, याची आम्हाला खात्री आहे. ही केवळ आमच्या एकट्याची लढाई नाही तर सर्व माध्यमांचीच लढाई आहे.


नवज्योत सिंग सिद्धू यांना त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे असे वाटते का?
काँग्रेससारख्या इतक्या मोठ्या पक्षामध्ये सिद्धू एकट्याच्या जीवावर नक्कीच काही करू शकत नाही. सिद्धूच्या पाकिस्तान दौऱ्याला पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी विरोध दर्शविला होता. पण पाकिस्तान दौऱ्यावरून आल्यावर सिद्धू यांनी स्पष्ट केले की त्यांचा 'कॅप्टन' अमरिंदर सिंग नसून, राहुल गांधी आहेत. राहुल गांधी यांनी हे नाकारले होते. पण सिद्धू यांच्या कृतीला काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींचा पाठिंबाच होता.