#Balakot : भारताकडून बालाकोट हल्ल्याचे पुरावे देण्यात यावेत- दिग्विजय सिंह
कारवाईवर मी प्रश्नचिन्हं उपस्थित करत नाही आहे. पण....
नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईवर मी प्रश्नचिन्हं उपस्थित करत नाही आहे. पण, सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं एक प्रगत युग आहे. त्यामुळे या हल्ल्याची उपग्रहांच्या माध्यमातून टीपलेली छायाचित्र मिळवणं शक्य असेलच. असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्राकडे बालाकोट हल्ल्याच्या पुराव्यांची मागणी केली आहे. या मुद्यावर आपलं मत मांडत त्यांनी अमेरिकेकडून ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आल्याच्या प्रसंगाचा संदर्भ जोडला.
पाकिस्तानने आता आणखी हिंमत दाखवत हाफिज सईद आणि मसूद अझहर यांनाही भारताच्या ताब्यात द्यावं ही मागणीही त्यांनी केली. माध्यमांशी बालाकोट हल्ल्याविषयी आपलं मत मांडणाऱ्या सिंह यांनी यावेळीच भारत सरकारने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे सादर करण्याविषयीचं मागणीवजा वक्तव्य केलं. सिंह यांची ही मागणी पाहता आता त्यावर मोदी सरकरार उत्तर देणार, की थेट हल्ल्याची छायाचित्र सादर करत त्या रुपात पुरावे सादर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात केला होता एअर स्ट्राईक
२६ फेब्रुवारीला, मंगळवारी पहाटे भारतीय वायुदलाच्या १२ मिराज विमानांच्या ताफ्याने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे हल्ला केला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला करत भारताकडून पुलवामा हल्लाचं सडेतोड उत्तर देण्यात आलं होतं. या हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या तणावाच्या वातावरणात वाढ झाली असून, नियंत्रण रेषा परिसरात त्याचे पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे.