नवी दिल्ली : राज्यसभेनंतर आज लोकसभेमध्येही जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या बाजूने ३७० मतं पडली तर ७० खासदारांनी याविरोधात मतदान केलं. पण या विधेयकावरून काँग्रेसमध्येच बेबनाव असल्याचं दिसत आहे. संसदेमध्ये काँग्रेसने या विधेयकाला विरोध केला. पण काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मात्र याचं समर्थन केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मिरमधून अनुच्छेद ३७० हटवल्याबद्दल काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी या निर्णयाचं समर्थन केलं. हा निर्णय घटनात्मक पद्धतीने घेतला गेला असता तर आणखी योग्य ठरलं असतं, असं मतंही शिंदे यांनी व्यक्त केलंय. मात्र, तरीही हा निर्णय देशाच्या हिताचा असल्यामुळे आपण त्याचं समर्थन करत असल्याचं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे.



तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी या विधेयकाला विरोध करत अखेर मौन सोडलं. 'राष्ट्रीय अखंडता ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीरचे एकतर्फी तुकडे केले जाऊ शकत नाहीत. लोकनियुक्त प्रतिनिधींना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि संविधानाचं उल्लंघन करण्यात आलं. देश लोकांनी बनतो, जमिनीच्या तुकड्याने नाही. शक्तीचा दुरुपयोग राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरू शकतो,' असं ट्विट राहुल गांधींनी केलं होतं.