आपला उमेदवार भले कट्टर गुन्हेगार असला तरी चालेल, पण जिंकलाच पाहिजे- काँग्रेस
भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर शक्य होईल त्या मार्गाने कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भोपाळ: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर शक्य होईल त्या मार्गाने कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
काँग्रेसने या निवडणुकीत शिवराजसिंह चौहान यांच्या भ्रष्ट कारभाराचा मुद्दा लावून धरला आहे. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आता मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा व्हीडिओ ट्विट केला आहे.
या व्हीडिओत कमलनाथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. अनेकजण म्हणतात की, गुन्हे दाखल असणाऱ्यांना उमेदवारी देऊ नका. मी तर म्हणतो, उमेदवारांवर भले चार किंवा पाच गुन्हे दाखल असोत, मात्र तो जिंकायला पाहिजे. मी स्पष्टपणे सांगतो की, मी फक्त जिंकणाऱ्याच्या बाजूने आहे, असे कमलनाथ यांनी म्हटले.
कमलनाथ यांच्या वक्तव्यावर शिवराजसिंह यांनी टीका करताना म्हटले की, जनता सुज्ञ आहे. २८ नोव्हेंबरला मतदान करून कोणाला विजयी करायचे, हे त्यांना माहिती आहे, असे चौहान यांनी सांगितले.