नवी दिल्ली : गेली दोन वर्ष कोरोनाने देशभरात थैमान घातलं. कोरोनामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तिसऱ्या लाटेपर्यंत देशातील करोडो लोकांना वेठिस धरलं. सरकारी आकडेवारीनुसार कोरोनामुळे देशात मृतांचा आकडा 5 लाख 21 हजार 751 वर पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र हे आकडे खोटे असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात 5 लाख नाही तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. 


राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, मोदीजी खरं बोलत नाहीत आणि कुणाला बोलू देत नाहीत. ते अजूनही खोटे बोलतात की ऑक्सिजनच्या (Oxygen) कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही! राहुल गांधी यांनी पुढे लिहिलंय, मी याआधीही म्हटले होतं, कोविड काळात सरकारच्या निष्काळजीपणामुळे 5 लाख नव्हे, तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला.  प्रत्येक पीडित कुटुंबाला 4 लाख रुपयांची भरपाई द्यावी, असेही राहुल गांधी म्हणाले.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 558 वर आली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 751 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 8 हजार 788 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 31 हजार 958 लोकांना कोरोनाची लागण झाली.