Rahul Gandhi on Nirmala Sitharaman: काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी लोकसभेत (LokSabha) अर्थसंकल्पावर (Union Budget) निवेदन मांडलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच दलित, मागासवर्गीय आणि गरीब यांचा उल्लेख करत त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद नसल्याची टीका केली. राहुल गांधींनी अर्थसंकल्पाला खीर म्हणत 20 लोकांनी बजेट तयार केले आणि या 20 लोकांमध्ये फक्त एक अल्पसंख्याक आणि एका मागासवर्गीय व्यक्तीचा समावेश होता असा आरोप केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींचं भाषण सुरु असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) हसत होत्या. राहुल गांधी यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं असता ते म्हणाले, "तुम्ही हसत आहात, पण ही हसण्याची गोष्ट नाही". राहुल गांधी म्हणाले की, "20 अधिकाऱ्यांनी भारताचा अर्थसंकल्प तयार केला आहे. म्हणजे बजेटची खीर वाटण्याचं काम 20 जणांनी केले आहे. सभापती महोदय, त्या 20 लोकांपैकी फक्त एक अल्पसंख्याक आणि एक ओबीसी आहे आणि फोटोत मात्र एकही नाही. तुम्ही फोटोत त्यांना मागे उभं केलं. त्यांना फोटोतही येऊ दिलं नाही".



यादरम्यान राहुल गांधी यांनी संसदेत फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना नकार दिला आणि संसदेत असे फोटो दाखवण्याची परवानगी नसल्याचं सांगितले. राहुल गांधी पुढे म्हणाले, "माझी इच्छा होती की, अर्थसंकल्पात जात जनगणनेचा मुद्दा यावा, जो संपूर्ण देशाला हवा होता. 95 टक्के लोकांना जातीची जनगणना हवी आहे. दलित, आदिवासी, मागासवर्गीय, गरीब सामान्य जाती आणि अल्पसंख्याक या सर्वांनाच जात जनगणना हवी आहे कारण प्रत्येकाला आपला सहभाग काय आहे आणि आपला वाटा काय आहे याची माहिती हवी आहे. पण मी पाहतो की सरकार खिरीचे वाटप करत असते आणि ते वाटणारे फक्त 2-3 टक्के लोक असतात आणि ज्यांना वाटतात तेदेखील फक्त 2-3 टक्के असतात".



राहुल गांधी भाषण करत असताना निर्मला सीतारमन यांना हसू अनावर झालं होतं. यानंतर निर्मला सितारमन यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. ही काही हसण्याची बाब नाही, मॅडम. ही जात जनगणना आहे. यामुळे देश बदलेल. महोदय, पद्मव्यूह किंवा चक्रव्यूहच्या लोकांना वाटते की देशातील मागासलेले लोक अभिमन्यू आहेत. देशातील मागासलेले लोक अभिमन्यू नसून अर्जुन आहेत.  ते तुमचा हा चक्रव्यूह तोडून फेकून देणार आहेत आणि इंडिया आघाडीने पहिले पाऊल टाकले आहे". राहुल गांधींनी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) चक्रव्यूह म्हणून उल्लेख केला.