हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर राहुल गांधी क्रिकेट खेळायला मैदानात
केएलपी महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले.
चंदीगढ: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरचे शुक्रवारी खराब हवामानामुळे हरियाणात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. रेवारी येथील केएलपी महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. यानंतर राहुल गांधी मैदानात क्रिकेट खेळत असलेल्या मुलांच्या घोळक्यात सामील झाले आणि क्रिकेट खेळायचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी फलंदाजी करताना एक-दोन चेंडू चांगलेच टोलावले. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राहुल गांधी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचार करत आहेत. मात्र, हवामान खराब असल्यामुळे आज त्यांना महेंद्रगढ येथील प्रचारसभा आटोपून दिल्लीला माघारी परतावे लागले. दरम्यान, या सभेत राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. नरेंद्र मोदी यांना अर्थशास्त्रातील काहीच कळत नाही. २०१४ नंतर अमेरिकेतील दोन-तीन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मला भेटायला आले होते. त्यांनी मला सांगितले की, आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण केले आहे. २००४ ते २०१४ या काळात भारताची अर्थव्यवस्था वेगाने का वाढली, याचे कारणही त्यांनी मला सांगितले. या दहा वर्षांमध्ये मनरेगा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी हेच घटक निर्णायक ठरले, असे राहुल गांधी यांनी सांगितले.