Ram Mandir Pran Pratistha Ayodhya: अयोध्येतील 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना (Ramlala Pran Pratistha) केली जाणार असून, यानिमित्ताने देशभरात उत्साह आहे. मात्र दुसरीकडे यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठवलं जात असताना काँग्रेससह काही पक्षाच्या नेत्यांनी ते नाकारलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधऱी यांनी कार्यक्रमास हजेरी लावण्यास नकार देत निमंत्रण फेटाळलं आहे. यानंतर आता राहुल गांधी यांनीही निमंत्रण मिळाल्यास जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेतृत्वाने हा भाजपाचा कार्यक्रम असल्याची टीका केली असून हा एक राजकीय प्रकल्प असल्याचं म्हटलं आहे. या मंदिरामागे भाजपाचा वैयक्तिक हेतू असल्याचा त्यांचा आरोप आहे. पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी भाजपा आणि आरएसएस नेत्यांकडून अर्धवट बांधकाम झालेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा कऱण्यामागील हेतूची विचारणा केली आहे. 


दरम्यान राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रेच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने 22 जानेवारीचा कार्यक्रम हा पूर्णपणे राजकीय नरेंद्र मोदी कार्यक्रम आहे. हा आरएसएस, भाजपा कार्यक्रम ठरत आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्षांनी कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे".



"आम्ही सर्व प्रकारचे धर्म आणि प्रथांसाठी खुले आहोत. हिंदू धर्मातील सर्वात वरिष्ठ असणाऱ्यांनाही 22 जानेवारीच्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं मत जाहीरपणे मांडलं आहे. हा एक राजकीय कार्यक्रम असल्याचं ते म्हणाले आहेत. याामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसच्या भोवती रंगवण्यात आलेल्या या राजकीय कार्यक्रमाला हजेरी लावणं आमच्यासाठी थोडं कठीणच आहे," असं राहुल गांधींनी सांगितलं.


पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, "आम्ही आधीच सांगितलं आहे की आमचे मित्रपक्ष किंवा पक्षातील कोणाला जायचं असेल तर ते जाऊ शकतात. पण आमच्यासाठी 22 जानेवारीला तिथे जाणं कठीण आहे. आरएसएस आणि भाजपाच्या या कार्यक्रमाला जाणं आम्हाला शक्य नाही".